राहुरी : ‘‘पक्ष फोडणे, सत्ता घेणे, हा लोकशाहीचा खरा रस्ता आहे काय? आयुष्यात काय काम केले असे फडणवीसांना विचारले, तर दोन पक्ष फोडले, असे त्यांना सांगावे लागेल,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज केली.
वांबोरी येथे आज राहुरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचार सभेत पवार बोलत होते.
पवार म्हणाले, "महाविकास आघाडीमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ मंत्रिमंडळात होते. त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातही शिंदे होते. त्यांनी गुवाहाटीला जाऊन सरकार पाडले. प्रत्येक मंत्रिमंडळात होते, तरी पक्ष फोडला. पक्ष फोडणे, सत्ता घेणे, हा लोकशाहीचा खरा रस्ता आहे काय? पक्ष फोडणे लोकांना मंजूर नाही. देवेंद्र फडणवीस यांना आयुष्यात कोणते मोठे काम केले, असे कुणी विचारले, तर त्यांना दोन पक्ष फोडले, असे सांगावे लागेल. पक्ष उभा करायला कष्ट लागतात, फोडायला नाही."
लोकसभा निवडणुकीत राज्यातील पराभवामुळे चिंता वाटायला लागली, म्हणून लाडक्या बहिणींना मदत केली. त्यास हरकत नाही. परंतु मागील सहा महिन्यांत राज्यात ६ हजार ८६६ मुलींचे अपहरण झाले. त्यांचा पत्ता लागत नाही. राज्यात महिला, मुलींवर अत्याचार झाले. त्या सुरक्षित नाहीत. तरुणांना रोजगाराची संधी नाही."
"राज्यात वर्षभरात ११०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीने सांगितले की, कर्ज काढून पीक उभे केले. अतिवृष्टीने पीक गेले. कर्ज तसेच राहिले. दुसऱ्या वर्षी रोगराईने पीक गेले.
त्यामुळे विषारी औषध घेऊन पतीने आत्महत्या केली. बळीराजाला आत्महत्या करावी लागते. हे पाप करणाऱ्या सरकारला सत्तेवर बसायचा अधिकार नाही, असेही पवार यांनी सांगितले.
देशाचे काम चालवायचे असेल तर ४०० खासदारांची गरज नाही, ३०० खासदारांवर सरकार चालते. तरीही नरेंद्र मोदी पुन्हा पुन्हा ४०० खासदार निवडून आणायचे सांगत होते. कारण त्यांना घटनेत बदल करायचे होते. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला यांच्याकडे पैसे नाहीत. शेतकरी कर्जबाजारी झाला असून आत्महत्या करीत आहे. अशा शेतकऱ्यांनी विरोधी भूमिका घेणाऱ्या सरकारला धडा शिकवावा.
- शरद पवार, ज्येष्ठ नेते (सिन्नर येथील सभेत बोलताना)
#ElectionWithSakal