मतदान आपल्या दारी
esakal November 14, 2024 12:45 PM

पुणे, ता. १३ ः ‘‘आमच्या सोसायटीत पहिल्यांदाच मतदान केंद्र असणार आहे. मला मतदान करण्यासाठी वाकडेवाडीला जावं लागत होतं. आमच्या सोसायटीत साधारण एक हजार मतदार आहेत. सोसायटीतच मतदान असल्याने मतदार स्वतःहून मतदान करण्यासाठी येतील. परिणामी मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल. प्रशासनाने अगोदर मतदार नोंदणीचा उपक्रम राबविला होता. शाळांमध्ये जाऊन रांगेत उभे राहण्याऐवजी फक्त घरातून खाली येऊन मतदान करायचे. आता आमच्या दारातच मतदान केंद्र आले आहे,’’ हे शब्द आहेत भोसलेनगर येथील कस्तुरी कुंज सोसायटीतील मतदार अनिल फेरवाणी यांचे.
पुण्यातील २१ मतदारसंघांपैकी तेरा मतदारसंघातील ६७ गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये १२६ मतदान केंद्र असतील. या मतदान केंद्रावर सुमारे एक लाख ३५ हजार मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर सोसायटीत मतदान केंद्र करण्यास सुरुवात झाली. लोकसभेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत देखील निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सोसायटीत मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. सुशिक्षित असलेला मतदारदेखील अनेकदा सुट्टीच्या नावाखाली मतदानाकडे पाठ फिरवतो. याचा मतदानाच्या एकूण टक्केवारीवर परिणाम होतो. याबाबत गोखले नगरमधील कपिला सहकारी वास्तुरचना संस्थांचे खजिनदार विलास कोटबागी म्हणाले, ‘‘अगोदरचे मतदान केंद्र हे जवळच्या महाविद्यालयात होते. पण आता आमच्याच सोसायटीतच मतदान करता येणार आहे. प्रशासनाने सोसायटीत मतदान केंद्र करण्याचा मदतीचा हात पुढे केला. आमच्या सोसायटीत दोन मतदान केंद्र असतील, जवळपास अठराशे मतदार मतदान करतील. सोसायटीतील संपूर्ण मतदान करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमच्या सोसायटीच्या परिसरातील काही मतदारांना देखील आमच्या सोसायटीत मतदान करता येणार आहे.’’

दृष्टिक्षेपात
- मतदारांची टक्केवारी वाढण्यासाठी सोसायटीतील मतदान केंद्रांची मदत होणार
- निवडणूक शाखा, सहकार विभाग आणि गृहनिर्माण महासंघाच्या वतीने मतदान जनजागृती
- सहकार विभागाकडून सोसायटीत सभा घेण्याच्या सूचना केल्या
- हडपसर आणि कोथरूड मतदारसंघात सर्वाधिक सोसायटीत मतदान केंद्र


पुण्यातील १२६ सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र केली आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी शंभर टक्के मतदान होण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. मतदारांनी मतदानाच्या दिवशी सहलीला न जाता मतदानाचा हक्क बजवावा. सोसायटीमध्येच मतदान केंद्र असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे. सोसायटीतील काही नागरिक समन्वयक म्हणून देखील काम करणार आहेत, जेणेकरून मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांची मदत होईल.
- सुहास पटवर्धन, अध्यक्ष, पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ

पुण्यात मतदान कमी होते. शहरी भागातील मतदारांचा प्रतिसाद काही कारणांनी कमी राहतो. सहकारी सोसायटीच्या ठिकाणी नवीन मतदान केंद्र केली आहेत. मतदारांच्या सोईसाठी सर्व सुविधा या मतदान केंद्रावर पुरवत आहोत. ज्या ठिकाणी शक्य आहे त्याठिकाणी सोसायटीत मतदान केंद्र केले आहेच. त्याबरोबरच गृहनिर्माण महासंघाच्या माध्यमातून आम्ही पुण्यातील पंचवीस हजार सोसायट्यांमध्ये पोहचण्याचा प्रयत्न करत आहोत. सोसायट्यांमध्ये मतदार नोंदणी, पत्ता, नावात बदल हे उपक्रम घेतले आहेत. आता सोसायट्यांमध्ये मतदान चिठ्ठ्यांचे वाटप होत आहे. यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की जास्तीत जास्त मतदार मतदान करतील.
- सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी

आकडे बोलतात

मतदारसंघ - सोसायट्यांची संख्या - मतदान केंद्रांची संख्या - मतदार
पुरंदर - ४ - ४ - ४,६४५
भोर - ६- ६ - ५,३८४
मावळ - १ - १ - ५०९
चिंचवड - ९ - १२ - १२,७२३
पिंपरी - ६ - ६ - ५,९७७
भोसरी - ३ - ७ - ८,६६३
वडगाव शेरी - २ - ६ - ५,६७२
शिवाजीनगर - ४ - ५ - ४,६९२
कोथरूड - १५ - ३१ - ३३,२९७
खडकवासला - ८ - ९ - ६,५४०
पर्वती - १ - १ - १,१६९
हडपसर - ४ - ३३ - ४१,२३६
पुणे कॅन्टोन्मेंट - ४ - ५ - ५,३९६
एकूण - ६७ - १२६ - १,३५,९०३

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.