Savita Malpekar : ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांनी सिनेसृष्टीतल्या अनेक मुद्द्यावर स्पष्ट भाष्य केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी डॉक्टर काशिनाथ घाणेकर सिनेमावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी दिवगंत अभिनेत्री रंजना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता मराठी सिनेसृष्टीमधले प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी (Chandrakant Kulkarni) यांच्यावरही सविता मालपेकरांनी गंभीर आरोप केलेत.
मराठी सिनेसृष्टीत होत असलेल्या गटबाजीवर कलाकार नेहमीच व्यक्त होत असतात. कलाकारांकडून होणाऱ्या गटबाजीवर अनेक कलाकारांवर आणि पर्यायाने त्यांच्या कामावर परिणाम होत असल्याचा आरोप कलाकार वारंवार करतात. पण ही गटबाजीच चंद्रकांत कुलकर्णी यांनी सुरु केल्याचा गंभीर आरोप सविता मालपेकर यांनी केलाय.
कॉकटेल स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीमध्ये सविता मालपेकर यांनी हा आरोप केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, सगळ्या पहिलं ग्रुपिझम इंडस्ट्रीमध्ये चंद्रकांत कुलकर्णीने आणलं. मी नावं घेऊन बोलेन, मी काही घाबरत नाही कुणाला. मला काय घेणं देणं आहे. सविता मालपेकरांच्या या आरोपामुळे पुन्हा एकदा सिनेसृष्टीमध्ये नव्या वादांना तोंड फुटणार नाही हे पाहणं गरजेचं ठरेल.
सविता मालपेकरांनी काशिना घाणेकर सिनेमावरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं की, मला तो सिनेमा पाहायचा नव्हता. पण मी एका ठिकाणी परीक्षण होते म्हणून मला तो बघायला लागला. तेव्हा मी अभिजीत देशपांडेंना म्हटलंही, हे अजिबात आवडलं नाहीये, फार चुकीचं तुम्ही दाखवलंय. पहिली गोष्ट तर त्यावेळी रस्त्यावर बसून कोणी दारु प्यायचे नाहीत. डॉक्टर शौकिन होते, पण ते त्यांच्याच ऑरोमध्ये असायचे. मी जितकं काम केलं आहे त्यांच्यासोबत, मी जितकं त्यांना ओळखते मला कधीच तो अनुभव आला नाही.
रंजना यांच्यावर आरोप करताना सविता मालपेकरांनी म्हटलं की, मला माझ्या सिनेमासाठी सायनिंग अमाऊंटही मिळाली होती. बरं मला नाचता येतं की नाही, हे सगळं पाहिलं होतं. फायनल झालं होतं. ब्लाऊजही शिवून झाले होते. फक्त साड्या राहिल्या होत्या. मला फोन येत नाही अजून म्हणून मी फोन केला. तेव्हा मला कळालं की माझा रोल जाऊन त्या ठिकाणी कामिनी भाटीयाला आणलं होतं.ही रिप्लेसमेंट रंजनाने केली होती. त्यावेळी ती हे करायची.