महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार 18 नोव्हेंबरला संपणार आहे. पण त्याआधी 17 नोव्हेंबरची संध्याकाळ प्रचाराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क मैदानासाठी उद्धव ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. आज खासदार संजय राऊत यांना नियमित पत्रकार परिषदेत 17 तारखेला मुंबईत कुठे सभा होणार? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी, आज ते स्पष्ट होईल असं सांगितलं. “आमची शिवतीर्थासंदर्भात भूमिका आहे. 17 नोव्हेंबरला हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. त्या दिवशी महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक बाळासाहेबांना आंदरांजली वाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर येतात. त्यामुळे संध्याकाळच्या सभेसाठी आम्हालाच परवानगी मिळावी. कोणाला अडवलं, तर वाद होऊ शकतात” असं संजय राऊत म्हणाले.
मी माझ्या स्वार्थासाठी भूमिका बदलली नाही, असं राज ठाकरे काल वरळीच्या सभेत बोलले. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “राज ठाकरे यांचं वाचन कमी आहे. ते उत्तम व्यंगचित्रकार आहेत. पूर्वी त्यांचं वाचन उत्तम होतं. काही पुस्तकांची निर्मिती त्यांनी केली. पण अलीकडे त्यांचा दैनंदिन घडामोडींशी संबंध कमी झाला आहे”
‘अदानीच्या पैशावर निवडणूक लढणाऱ्यांनी ज्ञान देऊ नये’
याच सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यावर राऊत यांनी उत्तर दिलं. “दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी एक मुलाखत दिली. महाराष्ट्रात सरकार पाडण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी जी बैठक झाली, त्याला देवेंद्र फडणवीस आणि गौतम अदानी उपस्थित होते. भले, अजित पवारांनी आता घुमजाव केलं असेल. याचा अर्थ राज ठाकरेंकडे माहिती नाही. आजही ते अदानी आणि फडणवीसांची बाजू लावून धरत आहेत. आम्ही या महाराष्ट्रात गौतम अदानीच्या विरुद्ध उभे आहोत. गौतम अदानीचा पैसा, मोदी-शाहंचा पाठिंबा याचा वापर करुन ठाकरेंचा सरकार पाडण्यात आलं. शिवसेना तोडण्यात आली. याच अदानीच्या पैशावर निवडणूक लढवली जात आहे. अदानीचा पैसा या निवडणुकीत खेळतोय. कारण भविष्यात त्याला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष महाराष्ट्रात नको आहेत. आम्ही या महाराष्ट्रात आहोत, तो पर्यंत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी, मराठी माणसाच्या न्याय हककाशी तडजोड करणार नाही. राज ठाकरेंनी हे समजून घ्यावं, अदानीच्या पैशावर निवडणूक लढणाऱ्यांनी ज्ञान देऊ नये” असं संजय राऊत म्हणाले.