पंढरपूर : कार्तिकी एकादशीच्या दिवशी सावळ्या विठुरायाचे दर्शन घेऊन तृप्त झालेल्या भाविकांनी जड अंतःकरणाने द्वादशीच्या दिवशी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. ''तुझे दर्शन झाले आता.. जातो माघारी पंढरीनाथा''! असे म्हणत लाखो भाविकांनी पंढरीचा निरोप घेतला. भाविकांनी येथील चंद्रभागा बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली होती.
कार्तिकी एकादशीदिवशी चंद्रभागा नदीमध्ये स्नान केल्यानंतर लाखो भाविकांनी अनेक तास दर्शनरांगेत उभे राहत श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर आज द्वादशीच्या दिवशी बहुतांश जणांनी पंढरीचा निरोप घेतला. निरोप घेण्यापूर्वी भाविकांनी प्रासादिक वस्तूंच्या दुकानांमध्ये चुरमुरे, बत्तासे, पेढा, सुगंधी अगरबत्ती, हळद-कुंकू, अष्टगंध आदी साहित्य खरेदी केले. यात्रेला आलेल्या भाविकांनी सोलापुरी चादर, देव देवतांच्या फोटो फ्रेम, श्री विठ्ठल रुक्मिणीच्या फायबरच्या प्रतिमा आदी साहित्य खरेदी केल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
यावर्षी कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सुमारे एक हजार जादा बसची सोय करण्यात आली होती. तर रेल्वे प्रशासनाने देखील भाविकांसाठी खास कार्तिकी यात्रा विशेष जादा रेल्वे गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या. या दोन्ही ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.
याशिवाय आपापल्या वाहनांतून आलेले भाविक परतीच्या प्रवासाला निघाल्याने द्वादशीच्या दिवशी सकाळपासूनच पंढरीतील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिस प्रशासनाने काटेकोर नियोजन केल्यामुळे कोठेही वाहतूक कोंडी झाली नाही. बसच्या तिकीट दराच्या तुलनेत रेल्वेचे तिकीट दर कमी असल्याने भाविकांनी रेल्वेच्या प्रवासाला पसंती दिल्याचे दिसून आले.
रेल्वे स्थानकावर भाविकांची गर्दी
परतीच्या प्रवासासाठी रेल्वे स्थानकावर आलेल्या भाविकांच्या गर्दीचे रेल्वे प्रशासनाने व्यवस्थित नियोजन केल्याचे दिसून आले. रेल्वे गाडी फलाटावर आल्यानंतर भाविकांचा गोंधळ उडू नये यासाठी रेल्वेचे अधिकारी ध्वनीक्षेपकावर भाविकांना सूचना देत होते व रेल्वे पोलिस भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष खबरदारी घेत होते.