स्वादुपिंडाचा कर्करोग म्हणजे अगदी गुपचूप पसरत जाणारा असा एक घातक आजार आहे. अन्य कर्करोगांच्या तुलनेत याची लक्षणे आधीपासून दिसत नाहीत, त्यामुळे त्याचे निदानही उशिरा होते. जेव्हा या कर्करोगाची लक्षणे समोर येतात, तेव्हा बऱ्याचदा हा कर्करोग इतर अवयवांमध्ये पसरलेला असतो, आणि त्यामुळे उपचार करणे कठीण बनते. त्यामुळे या आजाराबाबत जागरूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
istockphoto
स्वादुपिंडाचा कर्करोग कसा ओळखावा?स्वादुपिंडाचा कर्करोग शरीरात गुप्तपणे पसरत असल्यामुळे त्याचे प्राथमिक लक्षणे अगदीच माइल्ड किंवा दुर्लक्षित करण्यासारखी असू शकतात. खालील लक्षणे दिसू लागल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये:
पोटदुखी आणि अपचन: पोटात सतत दुखणे, गॅस होणे किंवा अपचनाची तक्रार होणे हे लक्षण या कर्करोगाचे संकेत देऊ शकतात.
भूक कमी होणे आणि वजन घटणे: अचानक भूक कमी होणे आणि अनावश्यक वजन कमी होणे हे कर्करोगाचे प्रमुख लक्षण असू शकते.
त्वचेला पिवळसर रंग: स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे कधीकधी यकृतावरही परिणाम होतो, त्यामुळे डोळे किंवा त्वचा पिवळसर दिसू शकते.
थकवा आणि अशक्तपणा: कोणत्याही कामात थकवा जाणवणे, आणि सतत अशक्त वाटणे हेही एक लक्षण असू शकते.
शरीरात काही अनियमित बदल: शरीरात गाठी जाणवणे किंवा पोटाच्या आत काहीतरी अडथळा जाणवणे हेही कर्करोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेतल्या संकेतांपैकी एक असू शकते.
स्वादुपिंडाचा कर्करोग प्रतिबंधित करण्यासाठी काळजी कशी घ्यावी?नियमित वैद्यकीय तपासणी: वयाच्या पन्नासच्या पुढील व्यक्तींनी किंवा ज्यांना कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास आहे त्यांनी वेळोवेळी तपासणी करून घेतली पाहिजे. वेळेवर निदान होणे महत्त्वाचे आहे.
आहारावर नियंत्रण: आपल्या आहारात ताज्या फळांचा समावेश करणे, भाजीपाल्यासाठी महत्त्व देणे, तळलेले आणि चरबीयुक्त पदार्थ टाळणे हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
धूम्रपान आणि मद्यपानाचे त्याग: धूम्रपान आणि मद्यपान हे कर्करोग वाढविणारे घटक आहेत. या दोन्हीचा त्याग करणे खूप महत्त्वाचे आहे.
वजन नियंत्रित ठेवणे: नियमित व्यायाम, योग आणि संतुलित आहारामुळे वजन नियंत्रित राहते. वजन वाढल्यास स्वादुपिंडावर ताण येऊ शकतो, त्यामुळे वजनाचे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
ताण आणि चिंता कमी करणे: अधिक ताण घेणे किंवा चिंता बाळगणे यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगाचे सराव करणे फायद्याचे ठरते.
हेही वाचा :Winter Season : हिवाळ्यातील सांधेदुखी होईल दूर; लाईफस्टाईलमध्ये करा 'हे' बदल
स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान करताना सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय आणि बायोप्सी यांसारख्या चाचण्या कराव्या लागतात. सुरुवातीच्या टप्प्यात हा आजार आढळल्यास सर्जरी, रेडिओथेरपी, आणि केमोथेरपीद्वारे त्यावर उपचार होऊ शकतो. याबरोबरच आधुनिक औषधोपचारामुळे या आजारावर लवकर उपाय करता येऊ शकतो.स्वादुपिंडाचा कर्करोग लवकर ओळखणे खूप कठीण असले तरी, त्याच्या लक्षणांकडे लक्ष दिल्यास त्याचे निदान करण्यास मदत होते.