“अडीच वर्ष तुम्ही शिवसेनेतल्या एका गद्दाराला मुख्यमंत्री केलं. पण शिवसेनेबरोबर 25 वर्ष युती असताना शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिला. त्याच्यामुळे फडणवीस खोट बोलत आहेत. मी त्या चर्चेच्या प्रक्रियेमध्ये होतो. हे चर्चाच करायला तयार नव्हते. मुख्यमंत्रीपदावर कोणतीच चर्चा होणार नाही, हे वारंवार सांगितलं जात होतं” असं खासदार संजय राऊत म्हणाले. मविआच्या काळात शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. उद्धव ठाकरेंना पाचवर्ष मुख्यमंत्रीपद कसं द्यायचं, असं शरद पवार म्हणाल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यावर “आमच्या पक्षातले गौप्यस्फोट फडणवीस कसे करु शकतात? त्यांच्या पक्षातले गौप्यस्फोट आम्ही केले, तर त्यांना पक्ष बंद करावा लागेल. शरद पवारांनी काय ठरवलेलं, काय नाही, हे माझ्या इतकं कोणाला माहित नाही, कारण सुरुवातीच्या प्रक्रियेमध्ये चर्चेसाठी उद्धव ठाकरेंच्यावतीने मी च होतो. उगाच देवेंद्र फडणवीसांनी नाक खुपसू नये” असं संजय राऊत म्हणाले.
“देवेंद्र फडणवीस यांना काहीही माहित नाही. सरकार बनतय, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतायत कळल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यांना वाटलं शिवसेना काय करणार? आपल्या पायाशी येणार. पण असं झालं नाही. राजकारण आम्हालाही येतं. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद नाकारुन आमचा अपमान केलात” असं संजय राऊत म्हणाले. “सरकार आणि मुख्यमंत्रीपद पाच वर्ष टिकवायच ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि आमची कमिटमेंट होती. मागच्या दोन अडीच वर्षांपासून फडणवीसांना खोट बोलण्याचा रोग लागलाय” असं हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
‘राजकारणात शुन्य कर्तुत्व असलेले लोक’
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांचा तालुक्याचा नेता असा उल्लेख केला. त्यावर राऊत म्हणाले, “सोडून द्या हो, शरद पवारांवर कोण बोलतय? तालुक्याचा नेता, गावचा नेता. शरद पवार काय आहेत, हे तुमचे सध्याचे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह यांना विचारा, मग बोला. कोणत्या विषयावर काय बोलतो, याचं भान राहिलं पाहिजे. ज्या पक्षाचा एक आमदार नाही, तो पवार साहेबांना बोलतो. शरद पवारांनी राज्याच, देशाच 50-60 वर्ष नेतृत्व केलं. मोदी सरकारनेच त्यांचा पद्यविभूषण देऊन त्यांचा सन्मान केला. राजकारणातले भीष्मपितामह म्हणतो त्यांना. राजकारणात शुन्य कर्तुत्व असलेले लोक बोलत असतील, तर हे चांगलं नाही” अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरेंरव टीका केली.