- डॉ. मालविका तांबे
आपल्या शरीरात अनेक अवयव फार महत्त्वाचे असतात, उदा. हृदय, फुप्फुस, मेंदू, यकृत, प्लीहा, अग्न्याशय वगैरे. यकृत हा अवयव पचनसंस्थेशी निगडित असतो, आपल्या शरीरातील बऱ्याच चयापचय क्रियांमध्ये याचा महत्त्वाचा सहभाग असतो. आयुर्वेदानुसार यकृत हे पित्ताचे स्थान आहे. यकृत हा कोठ्यातील १५ अवयवांपैकी एक अवयव आहे. यकृत आपल्या पोटामध्ये उजव्या फुप्फुसाच्या खाली कुशीमध्ये असते.
यकृत आकाराने मोठे असले तरी बरगड्यांच्या खाली असल्यामुळे सामान्य स्थितीत असता यकृत हाताला जाणवत नाही. यकृतात काही विकार आला वा काही कारणाने यकृताचा आकार वाढला तर पोटाला हात लावल्यावर यकृत असल्याचे जाणवायला लागते.
पञ्चदशकोष्ठाङ्गेषु एकम्, दक्षिणकुक्षेः
अधःस्थशरीरावयवः ॥...चरक शारीरस्थान
आयुर्वेदानुसार यकृत रक्तापासून तयार झालेले असते व रक्तवहस्रोतासाचे मूळ असते. तसेच यकृतामध्ये राहणारे रंजक पित्त रसधातूला रंग देते व रक्त तयार होते असेही आयुर्वेदात सांगितलेले आहे. यकृतात रक्तनिर्मितीचे कार्य होते असे आधुनिक शास्त्राचेही मत आहे. एकंदर यकृताचा रक्ताशी खूप जवळचा संबंध आहे.
त्यामुळे यकृतात बिघाड झाल्यास रक्तातही दोष उत्पन्न होतात. रक्ताल्पता (रक्त कमी असणे), रक्ताच्या दोषामुळे त्वचारोग होणे हे आयुर्वेदाच्या निदानातून बऱ्याच वेळा आढळते. म्हणूनच त्वचारोगाची आयुर्वेदिक चिकित्सा करत असताना यकृतावरही काम केल्यास चांगले परिणाम मिळतात.
शरीरात आलेल्या प्रत्येक गोष्टीवर, मग ते अन्न असो वा औषध, यकृताचे कार्य होते. त्यानंतर शरीराला आवश्यक असलेला सारभाग आणि शरीराला नको असलेला विषाक्त वेगळे केले जातात. सारभाग शरीराकडून स्वीकारला जातो तर टाकावू भाग शरीराबाहेर टाकला जातो. यकृताचे हे कार्य नीट न झाल्यास वेगवेगळे रोग होण्याची शक्यता असते.
सध्या अनेकांमध्ये आढळून येणारा यकृताचा म्हणजे फॅटी लिव्हर. यकृत हे मांसाच्या गोळ्यासारखे असते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. या मांसात जेव्हा मेद जास्त प्रमाणात एकत्रित व्हायला लागतो तेव्हा यकृताची काम करण्याची क्षमता कमी होऊ लागते. थोड्या प्रमाणात यकृतात फॅट (चरबी) असणे सामान्य असते. पण हेच प्रमाण प्रमाणाबाहेर वाढल्यास आपण त्याला फॅटी लिव्हर म्हणू शकतो.
यकृतात झालेले बिघाड लवकर लक्षात येत नाहीत. जेव्हा मुख्य लक्षणे दिसू लागतात तेव्हा बहुतांशी यकृताचे बरेच नुकसान झालेले असते. त्यामुळे यकृताची सुरुवातीपासून काळजी घेणे खूप महत्त्वाचे ठरते, त्याचबरोबरीने यकृताच्या आजाराच्या सुरुवातीच्या काळातील काही सामान्य लक्षणे आपण समजून घेऊ या.
मळमळ होणे, पोटात कसेतरी वाटणे, अस्वस्थ वाटणे, पोटात जडपणा वाटणे
अन्नात रुची न वाटणे, भूक न लागणे
उलट्या होणे, विशेषतः खाल्लेले अन्न व पित्त उलटून पडणे
शौचाला वारंवार जावे लागणे, मळामध्ये चिकटपणा जाणवणे
सकाळी उठल्यावर ताजेतवाने न वाटणे, सतत आलस्य वाटणे, कुठल्याही गोष्टीत मानसिक उत्साह न वाटणे वगैरे.
यातील बरीच लक्षणे लोकांना जाणवत असतात, पण त्याकडे नकळत दुर्लक्ष होत राहते. काही इतर त्रास होत असल्यामुळे सोनोग्राफी वगैरे केली असता लिव्हर फॅटी असल्याचे लक्षात येते. लिव्हर फॅटी होण्याची काही सामान्य कारणे याप्रमाणे,
यकृतात स्निग्ध पदार्थांची चयापचय क्रिया होत असते. ज्या वेळी चयापचय क्रियेत कुठलाही अडथळा उत्पन्न होतो तेव्हा यकृतात चरबीचे – फॅटचे प्रमाण वाढायला सुरुवात होते.
अति प्रमाणात मद्यपान करणे
पचण्यास जड, तेलकट, चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करणे
अति प्रमाणात फास्ट फूड घेणे
ज्या खाद्यपदार्थांमध्ये किंवा पेयांमध्ये फार प्रमाणात रासायनिक गोष्टींचा समावेश केलेला आहे अशा गोष्टी जास्त प्रमाणात सेवन करणे
पिण्याचे पाणी अस्वच्छ वा दूषित असणे
दूषित खाद्यपदार्थांचे सेवन करणे
खूप जास्त प्रमाणात अग्नीच्या, गरम गोष्टींच्या वा सूर्याच्या संपर्कात येणे
फार जास्त प्रमाणात व्यायाम करणे
फार जास्त प्रमाणात चालणे
अति मैथुन, फार राग, चिडचिड वा संताप होणे, फार आरडाओरडा करणे
आधुनिक आयुष्याचा विचार केला तर आज आपल्या आहारातून आपल्या शरीरात कळत नकळत रासायनिक पदार्थ बऱ्याच प्रमाणात जात असतात. यांची चयापचय क्रिया होऊन मल म्हणून निचरा करण्यासाठी यकृतावर मोठ्या प्रमाणात ताण येतो. त्यामुळे यकृतात फॅट साठण्याचे प्रमाण वाढत असावे. सध्याच्या काळात असलेल्या मानसिक ताणामुळेही एकूणच आयुष्यात राग, चिडचिड, संताप यांचे प्रमाण वाढलेले आहे. सतत गरम गोष्टींच्या संपर्कात नसले तरी मोबाइल, संगणक यांच्या वापराने शरीरात उष्णता वाढते.
सध्या झीरो फिगरचे फॅड असल्यामुळे फार प्रमाणात व्यायाम करणे, फार चालणे यामुळेही यकृतावर ताण येतो. वीक एण्डस् ला होणाऱ्या क्लबमधल्या पार्ट्यांमधील वाढते मद्यपानामुळे, व रात्रीच्या जागरणांमुळे यकृतावर ताण येतो. वजन कमी ठेवण्याच्या हेतूने कमी प्रमाणात खाणे किंवा फार जास्त उपवास करणे यामुळेही यकृताची कार्यक्षमता कमी होऊ शकते. एकूणच आधुनिक जीवनपद्धती यकृताचे विकार होण्यासाठी कारणीभूत असू शकेल.
उपाय
यकृताची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आहाराची खूप काळजी घेणे आवश्यक असते.
रोजचे पिण्याचे पाणी उकळलेले असावे. संतुलनचे जलसंतुलन घालून पाणी उकळणे अधिक उत्तम. असे उकळून गार केलेले पाणी किमान दोन लिटर तरी रोज प्यावे.
आहारात आवर्जून षष्ठीशाळी, रक्ती तांदूळ, जव, गहू, हिरवे मूग, मसूर, तूर, दुधी, पडवळ, पालक, गाजर, ब्रोकोली, कोहळा, घोसाळी, व विशेषतः ऊस, डाळिंब, संत्रे यांचा रस, भिजवलेल्या मनुका, जवस, चिया सीडस्, बदाम, अक्रोड, पपई वगैरे गोष्टी असाव्या.
दूध व दग्धजन्य पदार्थ आवर्जून आहारात असावे.
चांगल्या प्रतीचे तूप यकृताची कार्यक्षमता वाढविण्यास मदत करते. पण इतर प्रकारचे स्नेह खाण्यातून टाळावे.
शक्यतो कुळीथ, लसूण, दही, वगैरे गोष्टी आहारातून वर्ज्य कराव्या, तसेच मद्यपान पूर्णपणे टाळावे.
यकृताच्या मदतीसाठी काही गोष्टी करता येऊ शकतात, त्या अशा,
कोरफडीचा ताजा गर यकृतासाठी उत्तम असतो. चमचाभर गर थोड्या तुपावर पितळी कढईत परतून घ्यावा. त्यावर चिमूटभर हळद टाकून सकाळी अनाशेपोटी घ्यावा. यामुळे यकृताची कार्यक्षमता वाढून भूक व्यवस्थित लागायला मदत मिळते.
ताज्या आवळ्यांच्या रसात थोडा मध मिसळून घेतल्याने यकृताची कार्यक्षमता वाढते. इच्छा व प्रकृतीनुसार एक ते तीन आवळ्यांचा रस घेता येतो.
अर्धवट पिकलेले बेलाचे फळ यकृतासाठी उत्तम असते. अशा फळांपासून तयार केलेले मोरांबा (जॅम) अर्थात बिल्वसॅन सारखे रसायन घेणे यकृतासाठी हितकर असते.
सकाळी अनाशेपोटी पाव चमचा चांगल्या प्रतीची हळद थोड्या आवळ्याच्या रसात मिसळून घेण्याने यकृताला फायदा होऊ शकतो.
सकाळी पाव चमचा वेलची पूड, पाव चमचा जिरे पूड, तुपात मिसळून घेतल्यास यकृताला फायदा होऊ शकतो.
घरच्या घरी त्रिफळ्याचा काढा करून त्यात मध टाकून घेतल्यास यकृताला फायदा होऊ शकतो.
ताजे गोमूत्र हे यकृतासाठी श्रेष्ठ औषध आहे. गाईचे सकाळचे ताजे गोमूत्र सुती कापडातून गाळून त्याची शुद्धी करता येते. याची सविस्तर माहिती डॉ. मालविका तांबे यूट्यूब चॅनेलवर गोमूत्राच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. अशा शुद्ध केलेल्या गोमूत्रात पाणी घालून प्रकृतीनुसार ७ ते १० चमचे सकाळ-संध्याकाळ घ्यावे. यकृताचे दोष दूर करण्यासाठी व यकृताची कार्यक्षमता व्यवस्थित राहण्यासाठी हा एक खूप चांगला उपाय आहे.
शरीरातील पित्तदोष संतुलित करण्याच्या दृष्टीने संतुलन पित्तशांती गोळ्या घेणे, रात्री झोपताना संतुलन अविपत्तिकर चूर्ण घेणे, दिवसातून एकदा संतुलन रोझ ब्यूटी सिद्ध तेल हलक्या हाताने पोटावर लावणे, सकाळ संध्याकाळ बिल्वसॅन व पुनर्नवासव घेणे, तसेच रोज न चुकता संतुलन पादाभ्यंग घृत लावून पादाभ्यंग करणे हे सुद्धा यकृताच्या आरोग्यासाठी हितकर असते.
शास्त्रोक्त पंचकर्म करून विरेचन व विशेष बस्ती घेण्याचा उत्तम फायदा होतो.
काही रासायनिक औषधे घेतल्यास, किंवा शरीरात दुसरी व्याधी असल्यास, स्त्रियांच्या बाबतीत गरोदर असल्यास फॅटी लिव्हरची शक्यता असू शकते. कारणानुसार उपचारात बदल करावा लागू शकतो.
एकूणच यकृतरोग हा दुर्लक्ष करण्यासारखा रोग नाही. आयुर्वेदानुसार यकृतोदर, कामला, कुंभकामला वगैरे रोग व आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार फॅटी लिव्हर, सिऱ्होसिस, हिपॅटायटिस वगैरे बरेच रोग यकृताचे सांगितलेले आहेत. वेळीच त्यांच्यावर उपचार झाले तर पुढे येणारे संकट टाळता येणे शक्य आहे.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलेही रासायनिक औषध घेतल्यास ते यकृताला पचवावे लागते व त्यामुळे यकृतावर ताण येऊ शकतो व त्याचा परिणाम काय होईल याची शाश्र्वती नसते. त्यामुळे यकृतरोगांमध्ये आयुर्वेदिक औषधांची व उपचारांची मदत घेणे जास्ती प्रभावी ठरू शकेल, अशी शक्यता आहे.