छत्रपती संभाजीनगर : हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा, अशी घणाघाती टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते (Shiv Sena Shinde Group) संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली आहे. तर ठाकरेंचा पक्ष ओवैसींच्या दावणीला बांधला गेलाय, असेही त्यांनी म्हटले आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, काल मोदीजींनी सभा घेतली. त्या सभेतून मी आव्हान दिले होते की, उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलायचे तसे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणावे. परंतु काल आव्हान करून देखील उद्धव साहेबांनी ते वाक्य वापरलं नाही. वाक्य वापरायचं सोडून द्या. परंतु त्या सांस्कृतिक मंडळावर जय भवानी जय शिवाजी म्हटलं जायचं. त्या ठिकाणी अल्लाह हू अकबरच्या घोषणा देण्यात आल्या. त्याचा व्हिडिओ आता सगळीकडे व्हायरल होत आहे. या पद्धतीने आता त्यांचा पक्ष चालला आहे. ज्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी लाखोंच्या सभा घेतल्या त्या ठिकाणी अशा घोषणा देऊन जर हे भाषण करत असतील तर मला असे वाटते की त्यांचा पक्ष आता ओवैसींच्या दावणीला बांधला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी सभेत बोलताना तुम्ही कलंक लावण्याचं काम केलं, अशी टीका केली. याबाबत विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, भगव्याला कलंक कोणी लावला आहे? तिथे जमलेल्या शिवसैनिकांनी पाहिले आहे. अख्या महाराष्ट्राने पाहिले आहे. फक्त कोणावर तरी टोमणे मारायचे, दाढी म्हणायचं, माझ्या बॅगा चेक झाल्या म्हणायचं, काल मुख्यमंत्र्यांच्या देखील बॅगा संभाजीनगरच्या विमानतळावर चेक करण्यात आल्या. आम्ही इश्यू करायचा का? परंतु आमच्याच बॅगा का चेक केल्या? असे म्हणत बसायचे. निवडणूक आयोगाला त्यांचं काम करू द्यायला पाहिजे. राज्यघटनेने जे काही त्यांना अधिकार दिले आहे त्याचा वापर त्यांनी केला तर त्यात काही गैर नाही. कोणीही बॅगा विमानातून आणत नाही. जे बॅगा तुमच्याकडे येतात त्या कशा येतात? त्या मागच्या दारांनीच येतात ना. त्यामुळे चोर कधी उघड चोरी करत नाही आणि आमच्यावर टीका करण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
जॅकेट भाऊ, देवा भाऊ आणि दाढी भाऊ सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले. याबाबत विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, हे असंच बोलत रहा, बाकीच्यांना नावं ठेवा आणि स्वतःचा पक्ष फोडा. हिंदुत्वाच्या गप्पा मारणे बंद करा आणि आता सिल्व्हर ओकची माळ घेऊन जपत बसा, आता एवढेच राहिले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काय करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे. आम्ही कुणाचा झेंडा हातात घ्यावा हा फार गंभीर प्रश्न शिवसैनिकांसमोर असल्याचा पलटवार देखील संजय शिरसाट यांनी केलाय.