South Africa vs India 4th T20I:भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात टी२० मालिकेतील शेवटचा आणि चौथा सामना जोहान्सबर्गमधील द वाँडरर्स स्टेडियममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चौकार-षटकारांची बरसात केली आहे.
अवघ्या १५ षटकांच्या आतच भारताने २०० धावांचा टप्पा पार केला होता. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी फलंदाजी करताना जोहान्सबर्गचे मैदान गाजवले.
या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला भारतीय फलंदाजांनी योग्य न्याय दिला. सुरुवातीला अभिषेक शर्माने संजू सॅमसनच्या साथीने सलामीला खेळताना आक्रमक सुरुवात केली होती. त्यांनी ५ षटकांच्या आतच ५० धावांचा टप्पा पार केला.
पण अखेर १८ चेंडूत ३६ धावांवर अभिषेक शर्माला लुथो सिपाम्ला याने यष्टीरक्षक हेन्रिक क्लासेनच्या हातून झेलबाद केले. पण त्यानंतर संजू सॅमसनला तिलक वर्माने तोलामोलाची साथ दिली.
या दोघांनीही एकाही दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाला फार वरचढ होऊ दिले नाही. प्रत्येक षटकात मोठे फटके त्यांनी खेळले. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी दीडशे धावांची भागीदारीही केली.
त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये भारताकडून सर्वोच्च भागीदारी केली. संजू सॅमसनने २८ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले होते. तसेच त्यानंतर तिलकनेही २२ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते.
या दोघांनी अर्धशतकानंतरही आक्रमक खेळ सुरूच ठेवला होता. त्यानंतर ५१ चेंडूतच संजू सॅमसनने आधी शतक पूर्ण केले. त्यामुळे तो एका वर्षात आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा पहिलाच खेळाडू ठरला.
त्यानंतर तिलकने ४१ चेंडूत शतक ठोकलं. हे त्याचं सलग दुसरं आंतरराष्ट्रीय टी२० शतक ठोकलं. त्यामुळे तो सलग दोन आंतरराष्ट्रीय टी२० शतक करणारा सॅमसननंतरचा दुसराच भारतीय खेळाडू ठरला.
याशिवाय एकाच टी२० सामन्यात कसोटीचा दर्जा असणाऱ्या देशांच्या संघांकडून दोन खेळाडूंनी शतक करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.