Anupamaa Set Incident: अनुपमा (Anupamaa) ही स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका कायमच टीआरपीच्या शर्यतीत टॉपवर असते. त्यामुळे ही मालिका कायमच चर्चेत असते. पण नुकतच या मालिकेच्या सेटवर एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सेटवरील एका असिस्टंट लाईट मॅनचा मृत्यू झाल्याची धक्कदायक बातमी समोर येत आहे. एबीपी न्यूजच्या विशेष माहितीनुसार, गुरुवारी, 14 नोव्हेंबर रोजी 'अनुपमा'च्या सेटवर एक अपघात झाला. सेटवरच्या असिस्टंट लाइटमनला विजेचा धक्का लागला. त्यानंतर तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी 'अनुपमा'च्या टीमकडून सध्या कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. पण या लाईटमॅनच्या मृत्यूनंतर मुंबईतील आरए कॉलनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.याप्रकरणी चौकशीसाठी पोलीस शुक्रवारी 'अनुपमा'च्या सेटवरही पोहोचले.
टीआरपी लिस्टमध्ये टॉपवर असलेली मालिका यावेळी दुसऱ्या क्रमांकावर आहे. बऱ्याच कालावधीनंतर ही मालिका टीआरपीच्या शर्यतीमध्ये दुसऱ्या स्थानकावर पोहचली आहे. या मालिकेला 2.2 टीआरपी मिळाला असून 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पुढे आहे.
'अनुपमा' मालिकेची मुख्य अभिनेत्री अभिनेत्री रुपाली गांगुली सध्या तिची सावत्र मुलगी ईशा वर्मामुळे वादात सापडली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत ईशाने अभिनेत्रीवर तिच्या आईचे दागिने चोरल्याचा आणि आई-वडिलांचे लग्न मोडल्याचा आरोप केला होता. दरम्यान अनुपमाच्या निर्मात्यांनी मात्र तिला या प्रकरणात पाठिंबा दिला असून तिच्यासाठी पोस्टही केली होती.
अभिनेत्री रुपाली गांगुलीने तिची सावत्र मुलगी ईशा वर्माला मानहानीची नोटीस पाठवली होती. आता ईशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करून या प्रकरणावर मौन सोडलं आहे. ईशाने सांगितलं आहे की, ती आता या सगळ्यापासून खूप पुढे गेली आहे आणि ती अमेरिकेत असून सुरक्षित आहे. ईशा वर्माने सावत्र आई अभिनेत्री रुपाली गांगुलीवर वडिलांना ड्रग्स दिल्याचा आणि त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला होता. यानंतर अभिनेत्री रुपाली गांगुलीने या प्रकरणी कोर्टात धाव घेत, तिला मानहानीची नोटीस बजावली.