महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक देशात लक्ष वेधून घेत आहे. नामवंत राजकारण्यांचा मोठा सहभाग, प्रसारमाध्यमांमध्ये या निवडणुकीबद्दल उमटणारे पडसाद, सोशल मीडियामध्ये व्यापणारी जागा या सगळ्यांतून महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक देशात चर्चिली जात आहे. झारखंड आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे.
मात्र झारखंडपेक्षा महाराष्ट्राबद्दलची उत्सुकता देशात सर्वाधिक आहे. ही उत्सुकता इतकी मोठी आहे, की गांधी घराण्यातील प्रियंका गांधी-वढेरा यांचे निवडणुकीतील पदार्पण देखील झाकोळलं गेलं आहे. वायनाडमधल्या पोटनिवडणुकीत प्रियांका गांधींची उमेदवारी दाखल झालेली आहे. मात्र या हायप्रोफाइल निवडणुकीकडं सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे.
देशातील सर्वांत जास्त महसूल मिळवून देणारे राज्य, तसेच राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत अग्रस्थानी असलेले, त्याचबरोबर सर्व प्रमुख राज्यांचा विचार केला, तर जीडीपीमध्ये ज्या राज्याचा सर्वांत मोठा वाटा आहे आणि ज्या राज्यात मुंबईसारखी श्रीमंत महापालिका आहे, अशा राज्यातील निवडणूक प्रतिष्ठेची आणि लक्षवेधी ठरली आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला या निवडणुकीत विजय मिळाला, तर भारतीय जनता पक्षाला ते चांगले ठरेल. लोकसभा निवडणुकीमध्ये भगव्या आघाडीला जो धक्का बसला त्यावरचे ते औषध ठरेल. हरियानामध्ये ज्याप्रमाणे विजय मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला विशेषतः नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला समर्थन मिळाले आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांचे हात बळकट झाले, तसे या विजयाचे स्वरूप असेल. जागतिक पातळीवरील निवडणुकांचा संदर्भ देत एका व्यंग्यचित्रात मोदी यांच्या विजयाबद्दल भाष्य करण्यात आले होते.
जगात अर्थात अमेरिकेत बराक ओबामा ते ट्रम्प मध्यंतरीचा काळ ज्यो बायडेन यांचा असे बरेच बदल झाले, मात्र भारतात कमळ अजिंक्य राहिले. कमळाची आगेकूच कायम राहिली असं या व्यंग्यचित्रातून भाष्य करण्यात आलं होतं.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजय झाला, तर हरियानातील विजयामुळं भाजपला जे बळ मिळाले ते बळ अल्पकालीन ठरेल आणि इंडिया आघाडी भाजपला अडचणीत आणण्यासाठी आक्रमक होईल. केवळ इंडिया आघाडीच आक्रमक होईल असे नाही, तर भाजप आघाडीतील मित्रपक्ष देखील आपली भूमिका बदलून आक्रमक होऊ शकतात.
देशाच्या राजकीय नेपथ्याची गरज लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये भाजपला इथं विजय हवा आहे. मात्र केवळ महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला, तर येथील राजकारण स्थानिक प्रश्नांनी विस्कळीत झाले आहे. २०२४ मध्ये महाराष्ट्राची निवडणूक अत्यंत अवघड अशा टप्प्यावर आणि निकालाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी अवघड अशी झाली आहे.
या वेळच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये वेगवेगळी स्थिती आहे. संपूर्ण राज्यभर चालेल असा एकही मुद्दा नाही. प्रत्येक मतदारसंघात स्थानिक वादानं किंवा स्थानिक प्रश्नानं राज्यस्तरीय मुद्द्यांवर मात केलेली आहे.
महाराष्ट्रातील या वेळच्या विधानसभा निवडणुकीत वेगळेपणा असा आहे, तो म्हणजे प्रमुख सहा पक्ष निवडणूक रिंगणामध्ये आहेत. काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीत आहेत, तर सत्ताधारी महायुतीमध्ये अजित पवार यांचा गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे.
रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष महायुतीला मदत करत आहे. समाजवादी पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीला मदत करीत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात १३५ उमेदवार उभे केले आहेत, तर मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने देखील आपले उमेदवार स्वतंत्रपणे उभे केले आहेत.
चंद्रशेखर आझाद यांचा आझाद समाज पक्ष आणि असदुद्दीन ओवेसी यांचा एआयएमआयएम हा पक्ष देखील स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात आहे. ओवेसी यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मदत केली होती. या वेळेला त्यांचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून, मविआची मते कमी करू शकतो.
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील मतभेद आणि पवार घराण्यातील मतभेद महत्त्वाचे ठरणार आहेत. अजित पवार यांच्याविरुद्ध त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार लढत आहे. महाराष्ट्रातील ही लढाई राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी अटीतटीची लढाई आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करणे टाळले जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पवार यांना लक्ष्य केले गेले होते. या वेळी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शरद पवार यांच्यावर टीका करणे टाळले आहे.
महाराष्ट्रात या वेळी २८८ मतदारसंघांत २८८ प्रकारच्या लढाया सुरू आहेत, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. स्थानिक मते आणि जातीचा मुद्दा प्रभावी ठरत आहे. महागाई, बेरोजगारी आणि कांदा व कापूस या पिकांना मिळणारा दर, शेतकऱ्यांमधील नाराजी हे मुद्दे देखील राजकीय पक्षांचे टेन्शन वाढवीत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० मतदारसंघांमध्ये चांगली कामगिरी केली होती.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला असंच चांगलं वातावरण राहील, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने लोकसभेत बसलेला फटका लक्षात घेऊन तत्परतेने विविध उपाययोजना राबविल्या. महिलांच्या हातात थेट पैसे देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तसेच विविध कल्याणकारी योजना राबवून महायुतीने आपल्या विरोधी वातावरणात बदल होईल याची दक्षता घेतली.
त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या बाजूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सक्रियपणे भाग घेऊन पक्षाला मदतीची भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक निवडणुकीपासून अलिप्त होते. त्यांच्या नाराजीचा फटका पक्षाला बसला होता. विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता घरोघरी जाऊन भारतीय जनता पक्षाचा प्रचार सुरू केला आहे. त्यासाठी विविध पातळींवर बैठका घेतल्या जात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटना बांधणीचा फायदा भाजपला होईल यात शंका नाही.
या निवडणुकीत दोन मोठ्या गोष्टी ठळकपणे जाणवत आहेत. त्या म्हणजे महाविकास आघाडीच्या मागे मराठा समाजाचे झालेले ध्रुवीकरण, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी उभे केलेले आंदोलन महाविकास आघाडीला मदत करणारे ठरेल, असा अंदाज अनेक जण व्यक्त करीत आहेत. मनोज जरांगे-पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून जरी माघार घेतली असली, तरी त्यांनी दिलेल्या संकेतानुसार मराठा समाज महाविकास आघाडीला पाठिंब्याची भूमिका घेईल असं चित्र आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा, मुस्लिम आणि दलित समाजानं काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मनोज जरांगे-पाटील यांनी हे समीकरण बिघडले जाणार नाही याची काळजी घेतली आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जरांगे-पाटील यांची भूमिका अत्यंत आक्रमक आणि फडणवीस यांच्याबद्दल संताप व्यक्त करणारी होती.
फडणवीस यांच्याबाबत त्यांचा कठोर पवित्रा होता; परंतु एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबाबत त्यांची भूमिका मवाळ होती. जरांगे यांच्या छोट्या-मोठ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारी यंत्रणा किती तत्परतेने काम करीत होती हे मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर लगेच लक्षात येते.
लोकसभा निवडणुकीत उपकारक ठरणाऱ्या गोष्टींना या वेळी प्रथमच धक्का बसत आहे तो महायुतीच्या बाजूने अनेक महिला उघडपणे आपला मनोदय व्यक्त करीत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांचे ध्रुवीकरण प्रथमच दिसत आहे. जातीपातीचे किंवा स्थानिक मुद्दे बाजूला सारून अनेक महिला महायुतीच्या मागे उभ्या राहताना दिसत आहेत.
माझ्या मराठवाडा दौऱ्यामध्ये अनेक गावांमध्ये विविध समाजातील महिलांशी बोलताना मला महिलांमधील हा उत्साह प्रकर्षाने जाणवला. अनेक महिलांनी, त्यामध्ये काही मागास समाजातील देखील महिलांचा मोठ्या संख्येने समावेश होत आहे. या महिलांनी स्पष्टपणाने आमचे पती काँग्रेसला मतदान करतील; पण आम्ही मात्र आमचे भाऊ एकनाथ शिंदे यांच्यामागे उभे राहणार आहोत. त्यांनी आम्हाला मदत केली आहे.
ते जर सत्तेत पुन्हा परत आले, तर आमच्यासाठी ते नक्कीच काहीतरी करतील असा विश्वास या महिला ठामपणाने व्यक्त करीत आहेत. तळागाळातील महिलांकडून महायुती सरकारला मिळणारा हा पाठिंबा मतदानामध्ये किती बदलला जातो यावर पुढची पाच वर्षे कोणते सरकार टिकणार आहे, हे कळेल.
अर्थातच महाराष्ट्राची निवडणूक केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहणार नाही. येथील निवडणुकीचा निकाल देशभरातील राजकीय मंथनाला उत्तेजन देईल, यात शंका नाही. त्यामुळेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे महत्त्व वेगळे आहे.
(लेखिका ह्या नवी दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार असून राजकीय घडामोडींचे विश्लेषण करतात.)