हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
मुक्ता सरदेशमुख November 17, 2024 01:13 PM

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात विधानसभेच्या मतदानाला आता अवघे ३ दिवस उरले आहेत. आपापल्या पक्षाचा झेंडा फडकवत राजकीय प्रचाराला रंग चढला आहे. दरम्यान, एका अपक्ष उमेदवाराच्या पत्रकानं निवडणूक अधिकाऱ्यांनाही टेन्शन घ्यायची वेळ आली आहे. आधी हौसेनं निवडणुकीचं चिन्ह घेतल्यानंतर हा उमेदवार आचारसंहितेच्या कचाट्यात सापडल्याचं दिसतंय. चप्पल निशाणी असल्यानं मतदानाच्या दिवशी बुथच्या २०० मी अंतरामध्ये कोणीही पायात चप्पल घातली तर त्यांच्यावर आचारसंहिताभंगाची कारवाई करण्यात यावी असं पत्रकच या अपक्ष उमेदवारानं काढलंय. सध्या या पत्रकाची जोरदार चर्चा आहे.

मतदानादिवशी चपला घालयच्या की नाही? चर्चा रंगली

धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघातून अपक्ष उभारलेले उमेदवार गुरुदास संभाजी कांबळे यांनी 'आदर्श आचारसंहिते'चा भंग होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलंय. चप्पल ही माझी निशाणी असल्यानं ती पायात घातल्यानं माझा प्रचार व प्रसार होऊ शकतो. त्यामुळं बुथपासून २०० मीटरच्या आत मतदानाच्या दिवशी जर कोणी चप्पल घालून आलं तर त्याच्यावर आचारसंहिता भंग केल्याबद्दल कडक कारवाई करण्यात यावी असं या पत्रात या उमेदवारानं म्हटलंय. त्यामुळं आता परंड्यात मतदानाला येणाऱ्यांना अनवाणी पायानंच यावं लागणार का? अशी चर्चा रंगली आहे.

काय म्हणलंय पत्रकामध्ये?

'मी गुरुदास संभाजी कांबळे अपक्ष उमेदवार अनुक्रमांक 12 निशाणी चप्पल आपणास कळवू इच्छितो की सध्या आदर्श आचारसंहिता लक्षात घेता नियमाप्रमाणे मतदान बुत पासून 200 मीटरच्या आत कोणत्याही उमेदवाराचे चिन्ह प्रकाशित किंवा प्रदर्शित करण्यास सक्त मनाई असल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ शकतो व आचारसंहितेचा कुठल्याही प्रकारचा भंग होऊ नये म्हणून मी गुरुदास कांबळे आपणास लेखी अर्ज करतो की माझी निशाणी चप्पला असून त्याचा प्रचार व प्रसार मतदान बूथ पासून 200 मीटर च्या आत त आचारसंहिता भंग होऊ नये याची मी स्वतः दखल घेत असून त्याकरिता दिनांक 20/11/2024 रोजी मतदानाच्या दिवशी मतदान बूथच्या 200 मीटर अंतरामध्ये कोणतेही कर्मचारी पदाधिकारी उमेदवार व मतदार यांनी जर 200 मीटरच्या आत चप्पल घालून प्रवेश केल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी.'कारण चप्पल ही माझी निशाणी असल्यामुळे ती पायात घातल्याने माझा प्रचार व प्रसार लोकांनी पायात घालून प्रवेश केल्याने होऊ शकतो व आचार सहिता भंग होणार याच्यात शंकाच नाही. असं या पत्रकात म्हटलं आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.