संघाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींचा रोड शो, तर भाजपकडून कंगना राणावत यांच्या रोड-शोने प्रत्युत्तर
रजत वशिष्ठ, एबीपी माझा November 17, 2024 01:43 PM

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) आज (रविवार) नागपुरात एकानंतर एक असे दोन रोड-शो करणार आहेत. प्रियंका गांधी यांचा पहिला रोड-शो पश्चिम नागपुरात काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्या प्रचारासाठी होईल. तर दुपारी अडीच वाजता अवस्थी नगर चौकातून सुरू होणारा हा रोड शो दिनशॉ फॅक्टरी चौक जवळ संपुष्टात येईल. प्रियंका गांधींचा दुसरा रोड-शो मध्ये नागपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी होईल. गांधीगेट पासून सुरू होणारा रोड-शो संघ मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बडकस चौकावर जाऊन पूर्ण होईल. त्यामुळे या दुसऱ्या रोड शोच्या माध्यमातून प्रियांका गांधी संघाच्या बालेकिल्लापर्यंत जातील हे विशेष आहे. 

प्रियंका गांधींचा रोड शोला कंगना राणावत यांच्या रोड-शोने प्रत्युत्तर

दरम्यान, प्रियांका गांधी यांच्या रोड-शोला भाजपकडून खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्या रोडशो ने उत्तर दिले जाणार आहे. कंगना राणावत दुपारी एक वाजता पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यासाठी रोड शो करणार आहेत. हा रोड-शो लॉ कॉलेज चौकातून बजाज नगर चौकापर्यंत केला जाणार आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावलेले फुगे व पक्षाचे झेंडे अज्ञातांनी काढले

दरम्यान, प्रियंका गांधींच्या रोड शोच्या अनुषंगाने नागपुरातील बडकस चौक परिसरात स्वागतासाठी लावण्यात आलेले काही फुगे व पक्षाचे  झेंडे काही अज्ञातानी काढून टाकले आहे. बच्छराज व्यास यांच्या चौकावरील पुतळ्याला चारही बाजूंनी घेरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी फुगे व झेंडे लावले होते. बच्छराज व्यास यांचा पुतळा उभ्या असलेल्या ठिकाण (तिथला गोल चौक) ला खेटून लावण्यात आलेले फुगे व झेंडे अज्ञात लोकांनी काढले आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा रोष होण्याची शक्यता आहे.

कंगना राणावत यांचा खळबळजनक आरोप

राहुल गांधी हे नेहमी प्रधानमंत्री यांच्याबद्धल अपमानास्पद बोलत असल्याचा आरोप अभिनेत्री तथा भाजपच्या मंडी येथील खासदार कंगना राणावत यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्यावर बोलताना प्रधानमंत्र्यांबद्धल राहुल गांधी यांनी कुत्ते की मौत मरेगा! असे विधान केल्याचा आरोप केला आहे. भाषणातून हा आरोप केला असून हे विधान राहुल गांधी यांनी नेमके कुठे आणि केव्हा केले याचा मात्र भाषणात उल्लेख करणे कंगनाने टाळले आहे.

काँग्रेसचा शहजादा राहुल गांधी पंतप्रधान मोदींना हिटलर आहे, कुत्ते की मौत मरेगा, तो रावण आहे, दहा डोक्याचा अश्या गोष्टी राहुल गांधी करतात, पंतप्रधानाना काही आठवत नाही, असा खळबळजनक आरोप करीत कंगना राणावत यांनी उल्लेख केल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.