आयपीएल 18 व्या मोसमाआधी 24 आणि 25 नोव्हेंबरला सौदी अरब येथील जेद्दामध्ये मेगा ऑक्शन पार पडणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने कर्णधार श्रेयस अय्यर याला करारमुक्त केलं. श्रेयस अय्यर याने कोलकाता नाईट रायडर्सला त्याच्या नेतृत्वात 12 वर्षांनंतर आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली. मात्र त्यानंतरही केकेआरने श्रेयसला रिलीज केलं. त्यामुळे या मेगा ऑक्शनमध्ये श्रेयस अय्यर याच्यावर किती कोटींची बोली लागणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. अशात श्रेयसला मोठी जबाबदारी मिळाली आहे. श्रेयसला कर्णधार करण्यात आलं आहे.
श्रेयस अय्यर एका स्पर्धेत कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. श्रेयस सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीत मुंबईचं कर्णधारपद सांभाळणार आहे. एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनने श्रेयस अय्यरला या स्पर्धेसाठी कर्णधार म्हमून नियुक्त केलं आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला 23 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. श्रेयस कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेची जागा सांभाळणार आहे. अजिंक्य रहाणेने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईचं गेल्या हंगामात नेतृत्व केलं होतं.
इंडियन एक्सप्रेसनुसार, श्रेयस अय्यर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी श्रेयस अय्यर कॅप्टन्सी करणार आहे.तसेच मुंबई टीममध्ये पृथ्वी शॉ याचं कमबॅक झालं आहे. पृथ्वीला रणजी ट्रॉफी स्पर्धेतून फिटनेस आणि शिस्तभंगामुळे मुंबई टीममधून बाहेर करण्यात आलं होतं.
श्रेयस अय्यर मुंबईचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज
दरम्यान श्रेयस अय्यर याने मेगा ऑक्शमध्ये त्याची बेस प्राईज ही 2 कोटी इतकी ठेवली आहे. श्रेयसचं नाव हे मेगा ऑक्शनमधील पहिल्या फेरीतच आहे. अर्थात श्रेयसवर मेगा ऑक्शनमध्ये सुरुवातीलाच बोली लावण्यात येईल. श्रेयसने 2020 मध्ये दिल्लीला आपल्या नेतृत्वात आयपीएल अंतिम फेरीत पोहचवलं होतं. तसेच श्रेयसने 2024 मध्ये त्याच्या नेतृत्वात केकेआरला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. अशात आता ऑक्शनमध्ये श्रेयसला आपल्या गोटात घेण्यासाठी 10 संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे श्रेयसवर किती कोटींची बोली लागते? हे येत्या 24 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.