Savita Malpekar : ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) या सध्या अनेक मुद्द्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांनी अनेक मुलाखतींमधून सिनेसृष्टीतील अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कलाकारांना मिळणाऱ्या अल्प पेन्शनचा मुद्द्यावर खुलासा केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री असतानाचा हा किस्सा त्यांनी सांगितला आहे. कलाकरांच्या ग्रेड काढून त्यांना सरसकट पेन्शन मंजूर करण्यात आली असं त्यांनी यावेळी सांगितलं.
अजित पवारांना जेव्हा हा पेन्शनचा मुद्दा सांगितला त्यावेळी, त्यांनी सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याचं सांगितलं. तरीही अजित पवारांनी दिलेल्या शब्दानुसार त्यांनी कलाकारांच्या ग्रेड काढून सरसकट पेन्शनसाठी मंजूरी दिली. सविता मालपेकर यांनी नुकतीच 'इट्स मज्जा' या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. त्यामध्ये हा किस्सा सांगितला आहे.
सविता मालपेकर यांनी म्हटलं की, 'उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अजित पवार उपमुख्यमंत्री असताना, आम्ही काही मंडळी दादांना भेटायला गेलो. मी राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक सेलवर प्रदेश सरचिटणीस आहे. दादांकडे आम्ही भलीमोठी लिस्टच घेऊन गेलो होतो. आमच्याच नाट्य परिषदेचा एक पदाधिकारी त्याचा मला फोन आला. तो म्हणाला सविता मी जाऊन सांस्कृतिक मंत्र्यांना भेटून आलो, अमित देशमुख तेव्हा सांस्कृतिक मंत्री होते. ती व्यक्ती म्हणाली, मी पेन्शनचं त्यांना सांगून आलोय. तेव्हा ते म्हणाले मी दहा हजार रुपये देणार.. ए ग्रेड ला 10 हजार, बी ग्रेड ला एवढे. मी त्याला म्हटलं, ग्रेड ठरवणारा तू कोण? जर द्यायचे असतील तर सरसकट घ्या..'
पुढे त्यांनी म्हटलं की, 'त्यांच्या कॅटेगरीनुसार, ए ग्रेडवाल्यांना पेन्शनची काय गरज? सगळ्यात जास्त गरज ही बी आणि सी ग्रेडवाल्यांना असली पाहिजे.. जेव्हा आम्ही अजित दादांकडे गेलो तेव्हा त्यांना मी सांगितलं की, दादा ही ग्रेड आहे ती बंद करा.. ठरवणारे तुम्ही आम्ही कोण..? 1300 रुपये आणि 2700 रुपये? वृद्ध का म्हणतोय आपण? वृद्ध झाल्यावर जास्त गरज कशाची लागते, तर औषधपाण्याची.. मग आताच्या काळात ती औषधं चार दिवसांची पण येत नाहीत. जर द्यायचं झालं तर किमान महिनाभराची तरी औषधं येऊ दे त्यांना. किमान 20 हजार रुपये तरी द्या.. तेव्हा दादांनी सांगितलं की, खरंच आम्हाला लाज वाटते,की इतकी कमी पेन्शन.. पण तिजोरीत खडखडटात आहे.. मात्र मी नक्की प्रयत्न करेन..पण ह्याच्यापेक्षा नक्की जास्त देऊ.. तेव्हा मी त्यांना म्हटलं की, तुमच्या परीने जेवढं होईन तेवढं करा.. पण सरसकट पेन्शन द्या..'
Suniel Shetty : समीर भुजबळांसाठी सुनील शेट्टी मैदानात, खास मित्रासाठी व्हिडीओ शेअर करत म्हणाला...