मासेमारीसाठी गेलेल्या दोन मुलांसह वडिलांचा घटप्रभा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; मुलांचे मृतदेह सापडले, पण...
esakal November 19, 2024 02:45 PM

नातेवाईक आल्यानंतर त्यांनी नदीपात्राकडे जाऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी नदीच्या काठावर त्यांना दुचाकी व त्या तिघांची पादत्राणे आढळून आली.

यमकनमर्डी : घटप्रभा नदीत (Ghataprabha River) मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोन मुलांसह वडिलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बेनकनहोळी (ता. हुक्केरी) गावात घडली. लक्ष्मण रामा अंबली (वय ४९), रमेश लक्ष्मण अंबली (वय १४) व यल्लाप्पा लक्ष्मण अंबली (वय १२) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे बेनकनहोळी गावावर शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर यमकनमर्डी पोलिस ठाण्याचे (Yamakanmardi Police Station) निरीक्षक जावेद मुशाफीर व सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दल तसेच एनडीआरएफ पथकाला या घटनेची माहिती दिली. दोन्ही पथकांकडून तातडीने शोधमोहीम सुरू केली. (NDRF) पथकाने सुरू केलेल्या शोधमोहिमेला सायंकाळी सहा वाजता यश मिळाले. दोन्ही मुलांचे म्हणजे रमेश व यल्लाप्पा यांचे मृतदेह नदीपात्रात सापडले.

लक्ष्मण यांचा मृतदेह शोधण्याचे काम साडेसहा वाजेपर्यंत सुरू होते, पण अंधार पडल्यामुळे शोधमोहीम थांबविण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एनडीआरएफच्या पथकाकडून देण्यात आली. घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटप्रभा नदीच्या काठावर व राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बेनकनहोळी गावातील रहिवासी मासेमारी करतात.

दररोज रात्री नदीपात्रातील पाण्यात जाऊन जाळे लावले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी जाळे काढले जाते. रविवारी रात्री लक्ष्मण आपली दोन मुले रमेश व यल्लाप्पा यांच्यासह मासेमारीचे जाळे लावण्यासाठी दुचाकीवरून नदीपात्राकडे गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी परत आले नाहीत. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते. सोमवारी पहाटे लक्ष्मण यांच्या पत्नीने आपल्या नातेवाइकांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली.

नातेवाईक आल्यानंतर त्यांनी नदीपात्राकडे जाऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी नदीच्या काठावर त्यांना दुचाकी व त्या तिघांची पादत्राणे आढळून आली. त्यामुळे लक्ष्मण यांची पत्नी व नातेवाइकांनी तातडीने यमकनमर्डी पोलिस ठाणे गाठले. लक्ष्मण तसेच रमेश व यल्लाप्पा रात्रीपासून घरी परत आले नसल्याची माहिती दिली. दुचाकी व त्यांची पादत्राणे नदीकाठावर असल्याचेही पोलिसांना सांगण्यात आले.

त्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लक्ष्मण यांचे नातेवाईक, तसेच बेनकनहोळीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने नदीकाठावर जमले. राष्ट्रीय महामार्गालगतच ही घटना घडली होती. त्यामुळे गर्दी पाहून वाहने थांबविली जात होती. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. निरीक्षक जावेद मुशाफिर यांनी तातडीने अग्निशमन दल व एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले. पथक पोहोचताच तातडीने शोधमोहीम सुरू केली. या घटनेची नोंद यमकनमर्डी पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

आज पुन्हा शोधमोहीम

नदीपात्रात ज्या ठिकाणी जाळी लावली जाते. त्याच ठिकाणी शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली. शोधमोहिमेला सायंकाळी सहा वाजता यश मिळाले. दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले. वडील लक्ष्मण यांचा मृतदेह सापडला नाही. मंगळवारी शोधमोहीम सुरू करणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.