मुंबई सेन्ट्रल रेल्वे टर्मिनसवर प्रवाशाकडे सापडले तब्बल 42 लाख, ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसमधून प्रवासी करणार होता पलायन
सुरज सावंत November 19, 2024 03:13 PM

August Kranti Express Mumbai News : मुंबई सेन्ट्रल रेल्वे टर्मिनस (Mumbai Central Railway Terminus) येथून एका प्रवाशाकडून (Passenger) सुमारे 42 लाख रुपये जप्त केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी प्राप्तिकर विभागाला (Income Tax Department) माहिती देण्यात आली आहे. याबाबत ते पुढील तपास करत आहेत. मुंबई सेन्ट्रल टर्मिनसहून सुटणारी डाऊन 12953 ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसमधून (August Kranti Express) एक प्रवासी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पथके नेमूण सापळा रचला होता.

बॅगमध्ये सापडल्या पाचशे, दोनशे व शंभर रुपयांच्या नोटा 

मुंबई सेंन्ट्रल रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस आल्यानंतर पोलीस पथकाकडून प्रवाशांची तपासणी सुरू असतानाच, B-1 डब्यातील 71 क्रमांक आसनावर बसलेला प्रवासी उसामा आसिम (24) याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात रबर पॅटमध्ये पाचशे, दोनशे व शंभर रुपयांच्या नोटा सापडल्या. त्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्यामुळे, उसामा याला फलाटावर उतरवून त्याच्याकडील ट्रॉली बॅगची दोन सरकारी पंचासमोर तपासणी करण्यात आली. त्यावेळी, त्यात 41 लाख 91 हजार रुपये आढळले. ही रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तसेच प्रवासी उसामा आसिम  याची देखील चौकशी सुरु आहे. 

संबंधीत प्रवासी मुंब्रा परिसरातील रहिवासी

विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने जप्त रोकडीबाबत निवडणूक भरारी पथक, प्राप्तिकर विभाग यांना माहिती देण्यात आली. संबंधीत प्रवासी हा मुंब्रा परिसरातील रहिवासी आहे. सध्या प्राप्तिकर विभाग त्याची चौकशी करत आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत उद्या महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या काळात पैशांच्या कोणत्याही प्रकारे गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. ठिकठिकाणी तपासणी सुरु आहे. का ठिकाणी पोलिसांना रक्कम देखील आढळून आल्याच्या घटना घडल्या आहेत. 15 नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी 15 ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण 546 कोटी 84 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे, राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.