पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
अनिरुद्ध जोशी November 19, 2024 05:43 PM

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना मोठी घडामोड पाहायला मिळाली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी विरारमधील एका हॉटेलात 5 कोटी रुपये वाटल्याचा आरोप बविआकडून (BVA) करण्यात आला. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. आता या प्रकरणावर खुद्द विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawade) विरारमध्ये पैसे वाटत केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. विरार पूर्वेला असणाऱ्या मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये विनोद तावडे आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि काही पदाधिकार्‍यांमध्ये बैठक सुरु होती. त्यावेळी बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले आणि याठिकाणी पैसे वाटप सुरु असल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला. या प्रकरणाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने विनोद तावडे यांची गाडी तपासली.  

विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया

आता या प्रकरणावर विनोद तावडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, आज नालासोपारामध्ये कार्यकर्त्यांची बैठक होती. या बैठकीत मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचे नियम काय आहेत? हे सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. यावेळी आमचे विरोधक हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांचा समज झाला की मी पैसे वाटत आहे. याबाबत निवडणूक आयोगाने नक्कीच चौकशी करावी. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी, सीसीटीव्ही चेक करावे, त्यातून सत्य बाहेर येईल. मी 40 वर्षापासून भारतीय जनता पक्षात आहेत. हितेंद्र ठाकूर मला चांगले ओळखतात. सत्य सर्वांना माहिती आहे. परंतु निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी विनोद तावडे यांनी केली. 

काय म्हणाले हितेंद्र ठाकूर? 

याबाबत हितेंद्र ठाकूर म्हणाले की, 5 कोटी रुपये घेऊन विनोद तावडे आले होते. तसेच दोन डायऱ्या देखील सापडल्या आहेत. यामध्ये पैशांचं वाटप कसं केलं, याची माहिती होती. याबाबत सदर ठिकाणी पोलीस पोहचले आहेत. आम्ही तक्रार केली आहे. परंतु पुढे काय होणार या तक्रारीचं हे माहिती आहे. याचं सरकार आहे, असं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मला विनोद तावडे मला सारखे फोन करतायत. मला सोडवा..माझी चूक झाली..मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे करत आहेत. विनोद तावडे यांनी मला 25 फोन केले आहेत, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...

Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.