Parenting Tips: पालकांच्या या चांगल्या सवयींमुळे त्यांची मुले होतात शिस्तबद्ध आणि सुसंस्कारी
: लहान मुलांचा विकास आजूबाजूचे वातावरण आणि त्यांचे निरीक्षण याद्वारे होत असते. ज्यामध्ये पालक सर्वात महत्वाची भूमिका बजावतात. मूल आपल्या पालकांची वागणूक आणि त्यांची सवय आत्मसात करत आपले व्यक्तिमत्व घडवत असते. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या मुलाला शिस्तबद्ध, आदरणीय आणि सुसंस्कारी बनवायचे असेल तर येथे काही चांगल्या सवयी आहेत, जे प्रत्येक पालकांनी आंगीकारल्या पाहिजेत.
तुमची मुलं आज जे वागत आहेत ते तुमच्या सवयींचा परिणाम आहे. मुलं घरात जे बघतात तेच शिकतात आणि तशी वागतात. जर पालकांपैकी एक अधिक आक्रमक किंवा रागावलेला असेल तर मूल देखील त्याच प्रकारे वागते. त्यामुळेच तर मुलांना त्यांच्या पालकांचा आरसा म्हंटले जाते. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या मुलांना चांगला माणूस म्हणून भविष्यात घडवायचे असेल तर सर्वप्रथम तुमच्यात काही चांगले बदल घडवून आणणे गरजेचे आहे.
पालकांमधील या सवयी मुलांना बनवतात सुसंस्कारी आणि शिस्तप्रिय
पालक आपल्या मुलांना सकारात्मक दिनचर्या आणि जबाबदार वर्तनाद्वारे शिस्तबद्ध राहण्यास शिकवू शकतात. यासाठी तुम्हाला जर तुमच्या मुलांना घडवायचे असेल तर सर्वात आधी तुमच्यात काही चांगल्या सवयी असणे गरजेचे आहे, जे पाहून तुमचे मूल स्वतःहून त्याचे अनुकरण करेल. तुम्हाला सांगण्याची गरजच लागणार नाही.
आदर्श ठेवा
मुले जे पाहतात तसे करतात. जेव्हा पालक त्यांच्या कृतींद्वारे नियमांचे पालन करतात, जसे की वेळेवर कार्ये पूर्ण करणे आणि भावनांचे व्यवस्थापन करणे, मुलेदेखल समान वर्तन स्वीकारतात. त्यांच्यासाठी तुम्ही आदर्श बनता.
जबाबदार बना
मुलांनाज जबाबदार बनवायचे असेल तर तुम्ही मुलांसामोर घरची किरकोळ कामे करायला सुरुवात करा. जसे की झाडू काढणे, साफ सफाई करणे किंवा झाडांना पाणी देणे इ. मुलांना देखील या कामात सहभागी करून घ्या. ज्यामुळे मुले जबाबदार होतील. आपली कामे स्वतः करू लागतील.
वेळेचे महत्त्व
ठराविक दिनचर्या, विशेषत: खाणे, खेळणे आणि झोपणे यासाठी ठराविक वेळा अवलंबल्यास मुलांना वेळेचे महत्त्व समजेल. जेव्हा पालक स्वतः वेळ पाळतील आणि वक्तशीर होतील तेव्हा मुलांना वेळेचे व्यवस्थापन, आत्म-नियंत्रण आणि वचनबद्धतेचे महत्त्व देखील समजेल.
प्रशंसा करा
मुलांनी एखादी गोष्ट चांगली केली, तर त्याचे कौतुक किंवा प्रशंसा करा, ही कृती नकळत मुलांना शिस्त शिकवून जाते. नेहमी सकारात्मक रहा, कारण यामुळे तुमच्या मुलांचा आत्मविश्वास वाढेल.
संयम
मुलाला एखादी गोष्ट शिकवताना किंवा त्यांना सुधारताना पालकांनी संयम बाळगला पाहिजे. त्यांचे शांत वर्तन मुलाला धीर धरायला शिकवेल. संयमाने शिस्त शिकवणारे पालक मुलांना सुरक्षित वाटतात. पण जर तुम्ही त्यांनी केलेल्या चुकीबद्दल दंडित करत असाल तर मूल घाबरे होते. शिक्षेला घाबरण्याऐवजी त्यांना चुकांमधून शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. यामुळे मुलांमध्ये स्वयंशिस्तीचा दर्जा विकसित होतो.
मर्यादा लादणे
पालकांनी स्वतःला काही मर्यादा लादणे गरजेचे आहे. काय चांगले काय वाईट हे जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता, आणि स्वतः काही बंधने सेट करतात, तसेच ते कटाक्षाने पाळतात. तेव्हा मूल देखील या नियमांचा भाग होतो. तो देखील आपल्या वर्तनात त्या पद्धतीने बदल करतो.