नागपूर - ‘काही लोक अपक्षांच्या मागे गाड्या घेऊन खुलेपणाने फिरत आहेत. तुम्ही अपक्षांच्या पाठीमागे राहिला तरी शेवटी समाजाची खासदार म्हणून मी पाच वर्षे राहणार आहे. माझा विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा लेखाजोखा या काळात घेणार, असा धमकीवजा इशारा काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली आहे.
त्यांच्या या वक्तव्यावरून कुणबी समाजातून संताप व्यक्त होत आहे. वरोरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारार्थ खासदार इमरान प्रतापगढी यांची प्रचारसभा सोमवारी (ता.१७) झाली. त्यात बोलताना धानोरकर यांनी हा धमकीवजा इशारा दिला. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
धानोरकर म्हणाल्या, की आज जे लोक माला विरोध करीत आहेत. माझ्या विरोधात बोलत आहेत. त्यांनी लक्षात घ्यावे की, लोकसभा क्षेत्रात दोन हजार ८०० गावे आहेत. या गावांतील कोण कार्यकर्ता माझ्या बाजूने होता. कोण विरोधात होता. प्रत्येकाचा आढावा आजही माझ्याजवळ आहे.
विधानसभेतील गावनिहाय, घरनिहाय कुणी विरोध केला आणि कोण बाजूने होता हे काढण्यास फार वेळ लागणार नाही. २० नोव्हेंबरला मतदान झाले की कोणाला कसे ठेवायचे आणि कुणाला बारीक करायचे याचा सर्व विचार मी करून आहे.
या मतदारसंघात दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी बंडखोरी करीत वंचित बहुजन आघाडीकडून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. अनिल यांना काँग्रेसकडून उमेदवारी अपेक्षित होती. पण, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भाऊ प्रवीण काकडे यांच्यासाठी जोर लावला होता.
#ElectionWithSakal