Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?
esakal November 20, 2024 04:45 AM

Maharashtra Assembly Election 2024: भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करुन हितेंद्र ठाकूर यांनी विरारच्या हॉटेलमध्ये खळबळ उडवून दिली. त्यामुळे मंगळवारी दिवसभर ठाकूर चर्चेत होते. हे तेच ठाकूर आहेत ज्यांनी २००१ मध्ये स्व. विलासराव देशमुख यांचं सरकार तारलं होतं.

बदल्यात घेतली पाणीपुरवठा योजना

हितेंद्र ठाकूर यांनी २००१ मध्ये स्व. विलासराव देखमुख यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून काय घेतलं असेल तर एक योजना घेतली. वसई-विरारसाठी महत्त्वाकाक्षी असलेला प्रकल्प मार्गी लावला. ती योजना होती सूर्या पाणी पुरवठा योजना.

४ नगर परिषदा आणि ६४ गावांना पाणी देणारी वसई-विवारसाठीची उसगाव योजना मैलाचा दगड ठरली. हितेंद्र ठाकूर यांची काम करण्याची पद्धत आणि विस्तारलेलं शैक्षणिक संस्थांचं जाळं, यामुळे त्यांचा तीन मतदारसंघांवर प्रभाव आहे. सरकारला पाठबळ देण्याच्या बदल्यात स्वतःला मंत्रिपद किंवा इतर लाभ न घेता त्यानी लोकल्याणाची योजना राबवली, त्यामुळे त्यांचा प्रभाव कायम आहे.

२०१९ मध्ये पाठिंबा बदलला..

२०१९ मध्ये राज्यामध्ये नेमकी कुणाची सत्ता येईल, हे सांगणं अवघड झालं होतं. हितेंद्र ठाकूर यांच्याकडे तीन आमदार होते. भाजपची सत्ता येतेय, अशी परिस्थिती होताच हितेंद्र ठाकूर यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीने सत्तेचा दावा केला. तेव्हा त्यांनी मविआला पाठिंबा दिला.

स्वतः हितेंद्र ठाकूर आमदार आहेत. त्यांच्यासह त्यांचा मुलगा क्षितीज ठाकूर आणि राजेश पाटील हे दोन आमदार आहेत. हितेंद्र हे वसईमधून, क्षितीज नालासोपारा आणि राजेश पाटील हे भोईसर मतदारसंघातून आमदार आहेत.

२०२०-२०२१ मध्ये ईडीने केली होती कारवाई

४ हजार ३०० कोटींच्या पीएमसी बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये ईडीची कारवाई सुरु होती. या प्रकरणात हितेंद्र ठाकूर यांच्याशी संबंधित विवा ग्रुपच्या कार्यालयावर ईडीने छापेमारी केली होती. पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी प्रवीण राऊत याच्यासोबत ठाकूर कुटुंबियांनी पैशांची देवाण-घेवाण केल्याची माहिती ईडीला मिळाली होती. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांचा पुतण्या मेहूल ठाकूर आणि सल्लागार मदन गोपा चतुर्वेदी यांनी ईडीने अटक केली होती. हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा मुलगा क्षितीज ठाकूर हे विवा ग्रुपशी संबंधित नसल्याचं त्यांनी स्वतः केलं होतं.

तावडे प्रकरणात थेट आरोप

सोमवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विरारमधील एका हॉटेलमध्ये राडा घातला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मतदारांना वाटण्यासाठी पैसे आणले आहेत, असा आरोप करत कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यानंतर क्षितीज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर हॉटेलमध्ये आले. त्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. शिवाय काही बॅगांमध्ये पैसे असल्याचंही कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं आहे. मात्र तावडेंनी हे सगळे आरोप फेटाळून लावले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.