डोंबिवली - कल्याण ग्रामीण मधील आडीवली ढोकळी परिसरातील मनसेची शाखा दुपारी तोतया पोलिसांनी येऊन बंद केल्याची घटना घडली आहे. या पोलिसांनी मनसेची शाखा बंद, मतदार याद्या आणि वोटर स्लिप देखील घेऊन गेले आहेत. या घटनेमुळे मनसेचे उमेदवार राजू पाटील मात्र संतापले असून विरोधक सत्ताधारी अशा खेळ खेळत असतील तर उद्या मनसेची फौज उद्या मैदानात उतरवू. पोलिसांनी येथे गस्त वाढवावी, नाही झालं तर आम्ही आहोतच असा इशारा आमदार राजू पाटील यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. असे असतानाच मंगळवारी दुपारी आडीवली ढोकळी परिसरात दुपारी काही अज्ञात व्यक्ती तोतया पोलीस बनून आले. त्यांनी मनसेची शाखा बंद करत शाखेमधील मतदार याद्या आणि वोटर स्लिप घेऊन गेले. पोलीस वेशातील मंडळी आल्याने मनसे कार्यकर्त्यांनी देखील त्यांना अडविले नाही. याची माहिती मिळताच कल्याण ग्रामीणचे आमदार तथा मनसेचे उमेदवार राजू पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आमदार राजू पाटील म्हणाले, पोलीस अशी शाखा बंद करू शकत नाही. कारण इथे काही गैरप्रकार चालू नव्हते. मला दुपारी समजले की इथे काही जण पोलीसांच्या वेशात आले त्यांनी येथील याद्या आणि स्लीपर घेऊन गेले आणि शाखा बंद करून गेले. हा जो काही प्रकार सुरू आहे तो चांगला प्रकार नाही.
अशा प्रकारच राजकारण होऊ शकत नाही, आणि कोणी करूही नाही. सत्ताधारी पोलिसांना हाताशी धरून असा खेळ करत असतील तर मग मी पण येथे उद्या फौज उतरवतो. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या ठेका आम्हीच घेतला नाही. माझी पोलिसांना विनंती आहे की आडीवली ढोकळी परिसरात जो काही प्रकार सुरू आहे.
सत्ताधारी येथे पैसा वाटतात हे थांबलं नाही तर आम्ही येथे उतरू मग काय व्हायचं ते होऊ दे. पोलिसांनी हा वार्ड संवेदनशील जाहीर करून येथे गस्त वाढवावी त्यांना नाही झालं तर आम्ही आहोत असा इशारा आमदार पाटील यांनी दिला.
याविषयी अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांना विचारले असता पोलिसांनी असे काहीही केलेले नाही. आमचे पोलीस गेलेले नाही तेथे याची चौकशी केली जाईल असे ते म्हणाले.
आता या घटनेची सखोल चौकशी होते का. हे तोतया पोलीस कोण होते, त्यांना कोणी पाठवले. सीसीटीव्ही तपासून त्यांचा शोध घेतला जातो का? हे पहावे लागेल.
#ElectionWithSakal