Hemant Soren : माझ्याविरोधात प्रचारासाठी ५०० कोटी खर्च
esakal November 20, 2024 04:45 AM

रांची - माझ्याविरोधात अपप्रचार करण्यासाठी आणि जनतेच्या मनात माझ्याबाबत द्वेष पसरविण्यासाठी भाजपने सुमारे ५०० कोटी रुपये खर्च केले आहेत, असा आरोप झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मंगळवारी केला. सोरेन यांनी याआधीही भाजपवर असेच आरोप केले होते. भाजपने परराज्यातील नागरिकांना झारखंडमध्ये आणून माझ्याविरोधात कुजबूज प्रचार केला, असा आरोप सोरेन यांनी केला आहे.

‘उपलब्ध झालेल्या एका आकडेवारीनुसार भाजपने माझ्याविरोधात अपप्रचार करण्यासाठी ५०० कोटी खर्च केले आहेत. अशा पद्धतीने अपप्रचार करून आपली राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे सोपे असते, भाजप तेच करत असून ते आत यात तरबेज झाले आहेत.

मात्र, मी झारखंडचा नागरिक आहे, आमच्या संस्कृतीत अशापद्धतीचे कृत्य करण्यास मनाई असल्याने मी असे कोणतेही कृत्य करणार नाही,’ असे सोरेन यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. सत्य लपणार नाही.

‘भाजपने ओडिशा, बिहार, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील अनेक जणांना झारखंडमध्ये प्रचार करण्यासाठी आणले आहे. हे लोक सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रस्त्यांवरील नागरिकांच्या चर्चांमध्ये सहभागी होऊन सरकारविरोधात कुजबूज करत आहेत, यासाठी भाजपने सुमारे एककोटी रुपये खर्च केले आहेत,’ असा आरोप सोरेन यांनी केला आहे.

भाजपने राज्यात माझ्याविरोधात कुजबूज प्रचार’ सुरू केला आहे मात्र त्यामुळे सत्य लपत नाही, असे सोरेन म्हणाले. सोरेन यांनी याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती चावडीवर बसून भाजपचे कौतुक करून झारखंड मुक्तीमोर्चाच्या सरकारवर टीका करत आहे.

आमच्या विरोधात कुजबूज करण्यापेक्षा उघडपणे टीका करा, असे आव्हान सोरेन यांनी दिले आहे. दरम्यान, भाजपने सोरेन यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. निवडणुकीत पराभव होणार असल्याच्या भीतीने सोरेन यांना नैराश्य आले आहे, अशी खोचक टीका भाजपने केली आहे.

#ElectionWithSakal

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.