IPL Mega Auction 2025: इंडियन प्रीमियर लीग २०२५ हंगामासाठी २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे लिलाव होणार आहे. हा मेगा लिलाव असल्याने दोन दिवस चालणार आहे. दुपारी ३ वाजल्यानंतर हा लिलाव सुरू होईल.
दरम्यान, प्रत्यय संघात १९-२० पेक्षाही अधिक खेळाडूंच्या जागा शिल्लक असल्याने यंदा लिलावात अनेक खेळाडूंवर मोठ्या बोली लागताना दिसू शकतात. या लिलावात काही अनकॅप खेळाडूही लक्ष वेधून घेऊ शकतात. दरम्यान, अशाच अनकॅप ५ वेगवान गोलंदाजांबाबत जाणून घेऊ जे लिलावात मोठ्या रक्कमेत खरेदी केले जाऊ शकतात.
राजवर्धन हंगारगेकरवेगवान गोलंदाजी करणारा राजवर्धन हंगारगेकरवर मोठी बोली लागू शकते. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून २०२३ मध्ये २ सामने खेळला आहे, ज्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, राजवर्धनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे.
याशिवाय तो फलंदाजीतही खालच्या फळीत चांगले योगदान देऊ शकतो, त्यामुळे त्याच्यावर अनेक फ्रँचायझींचे लक्ष राहू शकते. त्याने ५ प्रथम श्रेणी सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या आहेत. २२ लिस्ट ए सामन्यांत ३९ विकेट्स घेतल्या आहेत, तर १४ ट्वेंटी-२० सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत.
नमन तिवारीउत्तर प्रदेशचा १९ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज नमन तिवारीवर देखील अनेक फ्रँचायझींचे लक्ष असेल. त्याने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतही शानदार कामगिरी केली होती. त्याने ६ डावात १२ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने दोन सामन्यात तर प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या होत्या.
त्याने उत्तर प्रदेश टी२० लीग स्पर्धेतही १३ विकेट्स घेतल्या आहेत. तो मधल्या आणि अखेरच्या षटकात प्रभावी गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे त्याला मोठी रक्कम मिळणार का, हे पाहावे लागेल.
मनवंत कुमार२० वर्षीय मनवंत कुमार हा कर्नाटकमधील गोलंदाज आहे. तो उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. त्याच्याकडे फलंदाजी करण्याचीही क्षमता आहे. त्याने कर्नाटकमधील टी२० स्पर्धा महाराजा ट्रॉफी स्पर्धेतही शानदार कामगिरी केली आहे.
त्याने २२ डावात ३७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याकडे सुरुवातीला, मधल्या षटकात आणि शेवटच्या षटकांमध्येही गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्याच्याकडे कटर आणि नकल बॉल टाकण्याचे कौशल्यही आहे. अशात त्याच्यावरही अनेकांचे लक्ष असू शकते.
आकिब खानउत्तर प्रदेशचा २० वर्षीय वेगवान गोलंदाज आकिब खान याने गेल्या काही सामन्यांत प्रभावशाली कामगिरी केली आहे. तो १९ वर्षांखालील भारतीय संघाकडून आणि भारत अ संघाकडूनही खेळला आहे. त्याने उत्तर प्रदेश टी२० लीग स्पर्धेतही ९ विकेट्स घेतल्या आहेत.
त्याच्याकडे चेंडू स्विंग करण्याची चांगली कला असून त्याला देशांतर्गत क्रिकेटचाही अनुभव आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने १६ सामन्यांत ४४ विकेट्स घेतल्या आहेत, त्याने ११ लिस्ट ए सामन्यांत १४ विकेट्स घेतल्यात, तर ५ ट्वेंटी-२० सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यावरही अनेक फ्रँचायझींचे लक्ष असू शकते.
शुभांग हेगडेकर्नाटकचा २३ वर्षीय डावखुरा फिरकीपटू शुभांग हेगडे यानेही त्याच्या कामगिरीने प्रशंसा मिळववी आहे. तो कर्नाटककडून १४, १६ आणि १९ वर्षांखालील संघांकडून खेळला आहे. त्याच्याकडे महाराजा ट्रॉफीमध्येही खेळण्याचा चांगला अनुभवही आहे.
तो फलंदाजीही करू शकतो. २०२४ मध्ये त्याने १५१ च्या स्ट्राईक रेटने २०१ धावा केल्यात, तर १४ विकेट्स घेतल्या आहेत. त्या देशांतर्गत क्रिकेटमध्येही ७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ४ लिस्ट ए सामन्यांत ३ विकेट्स घेतल्या, तर ४ ट्वेंटी-२० सामन्यांत २ विकेट्स घेतल्या आहेत.