Nagpur District Vidhan Sabha Election 2024: मतदान हा लोकशाहीचा उत्सव असून ते आपलं कर्तव्य आणि आपला अधिकार देखील आहे. आज कुटुंबासोबत मतदान केल आहे. महाराष्ट्रातील सर्व बंधू-भगिनी महाराष्ट्रातील जनतेला आव्हान आहे की सर्वांनी मतदान करावे. लोकशाहीत सरकारकडून आपण अपेक्षा ठेवतो, त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे. तसेच लोकसभेत ज्या याद्यांमध्ये घोळ होता, तो काही प्रमाणात दूर झालेला आहे. वोटिंग सिस्टीम लोकसभेत स्लो होती त्याच्यात आता इम्प्रूमेंट झालं आहे. लोकसभेसारखं ऊन आज नाहीये, त्यामुळे निश्चित टक्का वाढेल. असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बोलतांना व्यक्त केला आहे.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात महिलांची संख्या 5 ते 6% ने पुरुषांपेक्षा कमी आहे. महिला मतदान करून ही टक्केवारी भरून काढतील. जनतेचे प्रेम मिळतं तेव्हा चेहऱ्यावर हास्य असतं, प्रेम मिळताना दिसून येत आहे, त्यामुळे चेहऱ्यावर हास्य आहे. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला हा किती फेक आहे, हे कालच मी बोललो आहे. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचे विश्लेषण केलं असता ती एक सलीम जावेद यांच्या चित्रपटांची स्टोरी असल्यासारखे होती. असा टोला राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलतांना लगावला आहे. अनिल देशमुख यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ते बोलत होते. दरम्यान, बिटकॉइन बाबत नाना पाटोले यांनी या संदर्भात केलेलं वक्तव्य मी मिडियात बघितल आहे. या संदर्भात योग्य चौकशी झाली पाहिजे. काय खरं आहे, हे सर्वांसमोर आलं पाहिजे. आरोप खरच गंभीर आहे, गंभीर आरोपाची सखोल चौकशी होऊन त्यातून सत्य बाहेर येण हा जनतेचा अधिकार आहे. तसेच विनोद तावडे संदर्भात त्यांनी कुठलेही पैसे वाटले नव्हते. त्यांच्याजवळ पैसे मिळून आले नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी मतदान सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. तर संध्याकाळी 6 वाजता ही निवडणुकीची सांगता होत मतदारांचा अंतिम कौल मतपेटीत कैद होणार आहे आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी नंतर राज्याच्या सत्तेच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, सकाळी 9 वाजतापर्यंत नागपूरसह विदर्भात किती टक्के मतदान झाले ज्याची आकडेवारी समोर आली आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात काही प्रमाणात जास्त मतदान झाले आहे. विशेष म्हणजे नागपुरातील एकूण 12 मतदारसंघातील नागपूर शहर आणि ग्रामीण मधील इतर मतदारसंघाच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात ही काही प्रमाणात जास्त मतदान झाल्याचे चित्र आहे.
: