How to Find Voter Name: घरबसल्या शोधा मतदार यादीत तुमचे नाव! नाव शोधण्यासाठी 'हे' ३ पर्याय; आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ; मतदान कार्ड नसेल तरी करता येईल मतदान, वाचा...
esakal November 20, 2024 04:45 PM

steps to check voter name: जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ जागांसाठी बुधवारी (ता. २०) मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. पण, अनेकदा मतदारांकडे मतदान ओळखपत्र असते, तरीपण मतदान केंद्रावर गेल्यावर त्यांचे नाव मतदार यादीत नसल्याचे लक्षात येते. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्रावर पोचण्याआधीच मतदार यादीत नाव असल्याची खात्री करता येईल. त्यासाठी टोल फ्री क्रमांक, मेसेज व निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाचा पर्याय देण्यात आले आहेत.

मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी सर्वात आधी निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर https://www.eci.gov.in वर लॉग- इन करावे लागेल. वेबसाइट उघडल्यानंतर होम पेजवर जाऊन त्यानंतर डाव्या बाजूला थोडे खाली गेल्यानंतर Search Your Name in Voter List हा पर्याय दिसतो. त्यावर क्लिक केल्यावर आणखी एक पेज उघडेल.

ज्यात तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल. त्यानंतर आणखी एक पेज ओपन होईल. तेथे आपला EPIC (Electors Photo Identity Card) नंबर टाकावा. त्यानंतर कॅप्चा विचारला जाईल. कॅप्चा भरल्यानंतर तुमचे नाव जर मतदार यादीत दिसेल. त्यावर तुमची संपूर्ण माहिती असेल. त्या पानाची प्रिंटआऊट देखील काढू शकता. त्यात तुमच्या पोलिंग बूथची व इतर माहिती देखील असणार आहे.

मोबाईल क्रमांकावरूनही तपासता येईल नाव

जर मतदाराने त्याचा मोबाईल क्रमांक मतदार यादीत नोंदविला असेल, तर मोबाईल नंबर नोंदवूनही तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत तपासू शकता. त्याठिकाणी माहिती भरल्यानंतर शेवटी दिलेला कॅप्च कोड नोंदवावा लागेल. त्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर मतदार यादीत नाव असल्याची खात्री करता येईल.

---------------------------------------------------------------------

मेसेज किंवा टोल-फ्री क्रमांकावरून तपासू शकता नाव

मतदार यादीत नाव आहे की नाही? हे एसएमएसद्वारे देखील चेक करता येते. यासाठी मतदाराला त्यांचा ‘ECI Voter ID’ आणि EPIC नंबर टाकावा लागेल. ही सेवा टोल फ्री आहे. याद्वारे तुम्हाला तुमच्या नावाची मतदार यादीतील स्थिती सांगितली जाईल. तुम्ही १९५० या टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही माहिती मिळवता येईल. ही देखील सेवा मोफत आहे. या टोल फ्री नंबरवरुन तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत असल्याची खात्री करू शकता.

मतदान कार्ड नसेल तरी करता येईल मतदान

मतदार यादीत नाव असल्याने मतदान करायला जाण्याची इच्छा असलेल्या मतदारांकडे कार्ड नसल्याने मतदान करता येईल का, असा प्रश्न असतो. पण, मतदान केंद्रावर गेल्यावर त्याच्याकडे १२ प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे.

मतदानावेळी मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र नसल्यास त्याच्याकडे आधार कार्ड, ‘मनरेगा’अंतर्गत दिलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित केलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीअंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी दिलेले स्मार्ट कार्ड, पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना दिलेले विशेष ओळखपत्र यापैकी एक पुरावा मतदानासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.