भंडारा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) 288 जागांसाठी आज मतदान (Voting) पार पडत आहे. महायुती (Mahayuti), महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि इतर पक्षांच्या एकूण 4136 उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. नाशिकमधील 15 विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून अनेक मतदारसंघात राडा झाल्याचे दिसून आले आहे. आता भंडाऱ्याच्या (Bhandara) मोहाडीत राष्ट्रवादीचे दोन गट आपापसात भिडल्याची घटना घडली आहे.
तुमसर विधानसभेतील मोहाडी येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक विद्यालयाच्या मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते मतदान केंद्रावरचं आपापसात भिडलेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मतदारांना टाटा सुमोमध्ये बसवून थेट मतदान केंद्रात पोहचविले. यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला. यावेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्कीही केली. सुमारे अर्धा तास मतदान केंद्रावर हा प्रकार सुरू होता. भंडारा पोलिसांनी वेळीचं दखल घेत हे प्रकरण शांत केले.
बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. परळी विधानसभा मतदारसंघ वगळता पाचही मतदार संघामध्ये सुरळीतपणे मतदान प्रक्रिया दुपारपर्यंत पार पडली. मात्र, याला अपवाद ठरले आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी गाव. भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार महबूब शेख यांच्या समर्थकांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली. यानंतर हे प्रकरणाचे रुपांतर थेट हाणामारीमध्ये झाले. सुरेश धस समर्थकांना महबूब शेख यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
तर नांदगाव मतदारसंघात नोटांचं वाटप करणारी गाडी पकडल्याचा प्रकार घडला. साकोऱ्यात मतदारांना पैसे वाटप करणारी गाडी आल्याची माहिती अपक्ष उमेदवार डॉ. रोहन बोरसे यांच्या समर्थकांना मिळाली. गाडी अडवल्यानंतर ड्रायव्हर गाडी सोडून फरार झाला. यानंतर कार्यकर्त्यांनी हातात नोटा दाखवल्या. एका उत्साही कार्यकर्त्याने गाडीच्या टपावर उभं राहत नोटा फाडल्या. आता घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. गाडी कोणाची व पैसे कोणाचे आहेत? याबाबत पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. आता हे पैसे नेमके कुणाचे निघणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं