मुंबई मारवाड्यांची, आता मारवाडीतच बोलायचं; भाजपची सत्ता येताच मराठी महिलेला दुकानदाराची दमदाटी
Marathi December 03, 2024 11:26 PM

राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर मराठी माणसाची गळचेपी आणि मराठी माणसांच्या दमनशाहीला सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील मराठमोळा भाग अशी गिरगावची ओळख आहे. आता गिरगावमध्येच एका दुकानदाराने मराठी महिलेला आता फक्त मारवाडीतूनच बोला, अशी दमदाटी केली आहे. या घटनेचे वृत्त पसरल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दक्षिण मुंबईतील गिरगाव येथील खेतवाडी येथे ही संतापजनक घटना घडली आहे. सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असल्याने संबंधित दुकानदाराने माफी मागितली आहे.

मराठी माणसाला घर ,नोकरी नाकारण्याच्या अनेक घटना मुंबईत आधीही घडल्या आहेत. राज्यात आता भाजपाची सत्ता आल्याने मराठी माणसांवर दडपशाही होण्याची आणि मराठीची मुस्कटदाबी होण्याची भीती व्यक्त होत होती. ती आता खरी ठरत आहे. राज्यात भाजपची सत्ता आल्याने आता फक्त मारवाडीतच बोलायचं, मराठी चालणार नाही, अशी दमदाटी एका दुकानदाराने मराठी महिलेला केली. मुंबईतील मराठमोळा भाग अशी ओळख असणाऱ्या गिरगावातील खेतवाडी येथे हा प्रकार घडला आहे.

आपण मारवाडी व्यापाऱ्याच्या दुकानात गेलो होतो. त्याने मला मारवाडीतच बोलायला सांगितलं. मी याबाबत कारण विचारलं. तीनवेळा मी कारण विचारलं. त्यावर तो म्हणाला राज्यात भाजपाचं सरकार आलं आहे. त्यामुळे आता मारवाडीत बोलायचं. मराठीत बोलायचं नाही. आता ‘मुंबई पण भाजपाची आणि मुंबई मारवाडींची…, असे त्याने उर्मटपणे सांगितले, अशी माहिती त्या महिलेने दिली आहे.

आपण ही तक्रार घेऊन आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे गेले होते. तर त्यांनी उत्तर दिलं की आमच्यात वाद लावले जात आहेत. मी यांना उत्तर काय द्यायचं. मी लोढांना आतापर्यंत सहकार्य केलं. आम्ही त्यांना निवडून दिलं आणि ते आता म्हणतात की ते आम्हाला ओळखत नाहीत. तुम्हाला ओळखच पाहिजे का? तुम्ही मलबार हिलचे आमदार आहात तर तुम्हाला ओळखच पाहिजे का? या मलबार हिलमधील प्रत्येक नागरिक तुमचाच ना? मग ओळखच पाहिजे का?, असा सवालही संतप्त महिलेने केला आहे.

ही घटनेची माहिती सर्वत्र परसल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. प्रकरण वाढत असल्याचे लक्षात घेता मारवाडी दुकानदाराने आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.