मुंबईमध्ये पुन्हा आगीची घटना! म्हाडा इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग, ६ जणांची सुटका, तर १ जखमी
esakal December 22, 2024 01:45 AM

मुंबईतील चेंबूर परिसरात पुन्हा आग लागली आहे. काही दिवसांपुर्वीच चेंबूरच्या अमर महल परिसरात आग लागली होती. आता चेंबूर वाशीनाका कुकरेजा कंपाऊंडमधील एका इमारतीला आग लागली आहे. यात एक महिला जखमी झाली आहे. तर इतर सहा जणांची सुटका केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूर येथील वाशीनाका कुकरेजा कंपाऊंडमधील म्हाडाच्या बिल्डिंग क्र. 39 मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागली. त्यामुळे गॅसची बाटली लीक होऊन स्फोट झाला. यासोबतच आगीत अडकलेल्या 6 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर आगीत 1 महिला जळून जखमी झाली आहे. आग लागताच घटनेची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना देण्यात आली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर झाल्या होत्या. तर पोलिसही घटनास्थळी आले.

त्यानंतर आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या आगीत अडकलेल्यांना बाहेर काढले गेले. नंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे घबरात पसरली होती. आग लागल्यानंतर काही वेळातच आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ राजेशकुमार घाटे आणि अग्निशमन दलाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. आगीत अडकलेल्या सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.