Ajit Pawar: राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काल (२१ डिसेंबर) रोजी मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्यासह ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती प्रसासन अशी महत्त्वपूर्ण खाती स्वत:कडे ठेवली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खात्याचा भार देण्यात आला. उपमुख्यमंत्री यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
अर्थ खातं मिळाल्याच्या काही तासांमध्येच अजित पवार यांनी अर्थसंकल्पाबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्याचा पुढील हा ३ मार्च २०२५ रोजी सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना विश्वासात घेऊन, चर्चा करुन अर्थसंकल्प तयार करायचा आहे असेही त्याने म्हटले. अजित पवार मंगळवारी (२४ डिसेंबर) रोजी अर्थ खात्याचा पदभार स्विकारणार आहेत.
माध्यमांना अर्थसंकल्पाविषयीची माहिती देताना अजित पवार यांनी खातेवाटपावरही भाष्य केले. "काल खाते वाटप झालं. एकूण मंत्र्यांची संख्या जास्त आहे, तर राज्यमंत्री कमी आहेत. प्रत्येक मंत्र्याला एक-एक खाते देण्याची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली आहे. मंत्रिमंडळात काहीजण समाधानी आहेत, तर काहीजण असमाधानी आहेत. पण हे असं होतच राहणार. शेवटी प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या खात्याला न्याय द्यायचा प्रयत्न करायचा असतो", असे अजित पवार यांनी म्हटले.
अजित पवार हे सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. नागपूर संपल्यानंतर काल रात्रीच ते बारामतीमध्ये दाखल झाले होते. सकाळी सहा वाजल्यापासून त्यांनी बारामती शहरात सुरु असलेल्या विकास कामांची पाहणी करायला सुरुवात केली. पुढील कार्यक्रमांना ते उपस्थितही राहणार आहेत. संध्याकाळी बारामतीकरांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कारदेखील होणार आहे.