Maharashtra Breaking News Live Updates : कल्याणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण
Sarkarnama December 23, 2024 12:45 AM
मराठी कुटुंबाला मारहाण

कल्याणमध्ये हायप्रोफाईल सोसायटीमध्ये तीन दिवसांपुर्वी मराठी कुटुंबाला मारहाण झाली होती. आता पुन्हा एका परप्रांतिय कुटुंबाकडून मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याची आणखी एक घटना उघड झाली आहे. उत्तम पांडे असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याने मराठी तरुण त्याची पत्नी आणि आईला मराहाण केली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

BJP NEWS: कल्याणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण

कल्याणमध्ये भाजपा पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. हेमंत परांजपे असे या पदाधिकाऱ्याचे नाव असल्याचे समजते. कल्याण पश्चिम येथील पारनाका परिसरात आज दुपारी ही घटना घडली. स्कूटरवरून आलेल्या दोन्ही हल्लेखोरांनी परांजपे यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यांना मारहाण केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

K.P.Patil: ठाकरे गटाचे नेते के पी पाटील यांची पुन्हा कोलांटी उडी? भाजपच्या वाटेवर...

माजी आमदार के पी पाटील यांनी घेतली मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांचा के पी पाटील यांनी त्यांच्या घरी येऊन सत्कार केला. के पी पाटील यांनी ठाकरे गटाकडून राधानगरी विधानसभा मतदारसंघातून लढवली होती. विधानसभा निवडणुकीत प्रकाश आबिटकर यांनी के पी पाटील यांचा पराभव केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडीत गेलेले के पी पाटील पुन्हा महायुतीकडे येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Santosh Deshmukh Case : सरपंच देशमुख हत्येचा खटला बाळासाहेब कोल्हे लढणार

देशाला हादरुन सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्य सरकारने विशेष वकिलाची नियुक्ती केली आहे. बाळासाहेब कोल्हे असं या वकिलांचे नाव आहे. बाळासाहेब कोल्हे याना फौजदारी प्रकरणातील अनुभव, माहिती व अभ्यास असल्याने त्यांनी बऱ्याच आरोपींना शिक्षेस पात्र होईल, असे प्रकरणे निकाली लावले आहेत. त्यामुळे त्यांना विशेष जबाबदारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. असा आदेश प्रशासनाने काढला आहे. कोल्हे यांची फी गृह विभाग देणार आहे.‘विशेष लोक अभीयोजक” म्हणून कोल्हे यांची नियुक्ती केली आहे.

Uddhav Thackeray Raj Thackeray were Gathered Family Event: महापालिका निवडणुकीत एकत्र येतील?

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर तुटून पडणारे राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे आज एका विवाहसोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. दोघांनी एकमेकांशी संवाद साधला आहे. दादर येथे राज ठाकरे यांच्या भाच्याचा विवाहसोहळा आहे. या कौटुंबिक सोहळ्याला राज ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आदी ठाकरे परिवार उपस्थित आहे. आठ दिवसापूर्वी हे दोन्ही बंधू कौटुंबिक कार्यक्रमात ताज लँड्स एन्ड या हॉटेलमध्ये काल एकत्र आले होते. राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक पाटणकर यांच्या लग्नात हजेरी लावली होती. त्यावेळी रश्मी ठाकरे यांनी स्वतः राज ठाकरेंचं स्वागत केलं. पण राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे यांची थेट भेट थोडक्यात हुकली होती. आज मात्र त्यांनी मनमोकळेपणाने एकमेकांशी संवाद साधला. आगामी महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का? अशी चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे.

Ajit Pawar on Budget : राज्याचा अर्थसंकल्प कधी जाहीर होणार? तारीख ठरली

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर काल (शनिवारी) खातेवाटप झाले. फडणवीस सरकारमध्येही अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते आले आहे. त्यांच्यावर पुन्हा ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अर्थसंकल्प साजरा करण्याची तारीख ठरली आहे. तीन मार्च रोजी अजित पवार विधीमंडळात अर्थसंकल्प मांडणार असल्याची माहिती आहे.

Santosh Deshmukh murder case: मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : मराठा क्रांती मोर्चो

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करा, त्यांचे निकटवर्तीय असलेले धनजंय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चोने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीत दिले आहे. या निवेदनावर सुनील सस्ते, ॲड विजय तावरे, सचिन शिंदे, विकास खोत आदींच्या सह्या आहेत.

Local Bodies Election: 4 जानेवारी रोजी सुनावणी, कार्यकर्ते लागले कामाला

नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मन की बात' मांडली. यावेळी कार्यकर्त्यांना कामाला लागा, असे सांगत येत्या तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असे संकेत फडणवीस यांनी दिले. गेल्या पावणेतीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या रखडल्या आहेत. निवडणूक प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. यावर 4 जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्ष आता या निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.