India Women vs West Indies Women 1st ODI: रविवारी भारतीय महिला संघ आणि वेस्ट इंडीज महिला संघात वनडे मालिकेला सुरुवात झाली असून पहिला सामना वडोदरा येथे झाला. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने दणक्यात विजय मिळवला. भारताने या सामन्यात २११ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजसमोर ३१५ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला २६.२ षटकात सर्वबाद १०३ धावा केल्या आहेत. भारताच्या या विजयात स्मृती मानधना आणि रेणुका सिंग ठाकूरने मोलाचा वाटा उचलला.
वेस्ट इंडिकडून ३१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार हेली मॅथ्युज आणि कियाना जोसेफ यांनी डावाची सुरुवात केली. पण या दोघीही शुन्यावर बाद झाले. कियाना पहिल्याच चेंडूवर धावबाद झाली, तर मॅथ्युजला तिसऱ्याच षटकात रेणुका ठाकूरने बाद केले.
रणूकाने डिएंड्रा डॉटीनलाही ८ धावांवर त्रिफळाचीत केले, कर रक्षदा विल्यम्सला १६ चेंडूत ३ धावांवर तितास साधूने त्रिफळाचीत केले.पाठोपाठ आलियाह एलियेन १३ धावांवर बाद धाली. तर शेमिन कॅम्पबेल २१ धावांवर बाद झाली. त्यांनाही रेणुकानेच बाद केले.
शबिका गजनबी (३) आणि झायदा जेम्सही (९) स्वस्तात बाद झाले. नंतर एफी फ्लेचर आणि करिष्मा रामहाराक यांनी झुंज दिली. परंतु, करिष्माला ११ धावांवर दीप्ती शर्माने बाद केले. त्यानंतरही शमिला कॉनेलला ८ धावांवर प्रिया मिश्राने बाद केले. एफी फ्लेचक २४ धावांवर नाबाद राहिली.
भारताकडून रेणुकाने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. प्रिया मिश्राने २ विकेट्स घेतल्या. तितास साधू आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पुर्वी, वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ९ बाद ३१४ धावा केल्या. भारताकडून स्मृती मानधानाने १०२ चेंडूत सर्वोच्च ९१ धावांची खेळी केली.
तसेच हर्लिन देओलने ४४ धावांची, तर प्रतिका रावलने ४० धावांची खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३४ धावांची, तर जेमिमा रोड्रिग्जने ३१ धावांची खेळी केली. तसेच ऋचा घोषने २६ धावा केल्या.
वेस्ट इंडीजकडून झायदा जेम्सने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तर हेली मॅथ्युजने २ विकेट्स घेतल्या, तर डिएंड्रा डॉटीनने १ विकेट घेतली.