INDW vs WIW : पहिल्या वनडे सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर मिळवला दणदणीत विजय, 211 धावांनी केलं पराभूत
GH News December 23, 2024 03:07 AM

पहिल्या वनडे सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला आहे. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर भारताच्या वाटेला फलंदाजी आली. भारताने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. भारताने 50 षटकात 9 गडी गमवून 314 धावा केल्या. तसेच विजयासाठी 315 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही वेस्ट इंडिजला गाठता आलं नाही. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ अवघ्या 103 धावांवर तंबूत परतला. भारताने वेस्ट इंडिजवर 211 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली तरी वेगवान गोलंदाज रेणुका ठाकुर सिंग..रेणुका सिंगने 10 षटकात 29 धावा देत 5 गडी बाद केले. तसेच एक षटक निर्धाव टाकलं. दुसरीकडे, स्मृती मंधाना जबरदस्त फॉर्मात असल्याचं दिसत आहे. टी20 मालिकेत सलग तीन अर्धशतकं झळकावली होती. आता वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातही अर्धशतक झळकावलं आहे. स्मृती मंधानाचं शतक अवघ्या 9 धावांनी हुकलं.

कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितलं की, ‘स्मृती ज्याप्रकारे फलंदाजी करत आहे, ती बाब अप्रतिम आहे. रेणुकाची गोलंदाजी अप्रतिम होती आणि आजचा दिवस खास होता. आम्ही क्षेत्ररक्षणाबद्दल देखील बोलत आहोत, आम्ही मागील मालिकेत आणि आज ज्या प्रकारे कामगिरी केली आहे ती चांगली आहे. भारतात सुविधा उत्तम आहेत, आम्हाला घरच्या परिस्थितीत खेळायला आवडते. सुंदर मैदान, सुंदर परिस्थिती, आम्ही बीसीसीआयच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभारी आहोत.’

सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर रेणुका सिंह ठाकुरही व्यक्त झाली. ‘संघ मला प्रेरित करतो. हरमनने मला गोलंदाजी करायची आहे का असे विचारले आणि विकेट पडल्याने माझा आत्मविश्वासही वाढला. काल आम्ही काही स्पॉट बॉलिंग केली कारण ती वनडेसाठी महत्त्वाची आहे. आम्ही सिंगल-विकेट बॉलवर लक्ष केंद्रित केले, मी झुलन गोस्वामीशीही बोललो आणि तिने मला यात मदत केली.’, असं रेणुका सिंह ठाकुरने सांगितलं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

वेस्ट इंडिज महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शेमेन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, रशादा विल्यम्स, झैदा जेम्स, शबिका गजनबी, आलिया ॲलेने, शमिलिया कोनेल, एफी फ्लेचर, करिश्मा रामहरक.

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सायमा ठाकोर, तितास साधू, प्रिया मिश्रा, रेणुका ठाकूर सिंग

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.