मुंबई : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या (ता. २३) परभणीच्या दौऱ्यावर येत असून ते सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. सकाळी १२.३० वाजता विशेष विमानाने नांदेड येथे आगमन झाल्यानंतर नांदेडहून ते मोटारीने परभणीला जाणार आहेत. त्यानंतर ते सूर्यवंशी व वाकोडे यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत.
नांदेडहून संध्याकाळी विमानाने दिल्लीला परतणार आहेत. या वेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार,अमित देशमुख, खासदार रवींद्र चव्हाण, डॉ. कल्याण काळे, डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी सूर्यवंशी यांना अटक केली होती. त्यांचा कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणात शांतता प्रस्थापित करत असताना आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विजय वाकोडे यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
सरपंच हत्येप्रकरणी आज सर्वपक्षीय बैठक
बीड : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळविण्यासाठी सर्व पक्ष, समाज व संघटना एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी (ता. २४) शहरात सामूहिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यासाठी सर्व पक्ष, संघटना आणि सर्वच विचारांच्या लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. देशमुख यांच्या हत्येप्रकरणी ‘विशेष लोक अभियोजक’ म्हणून बाळासाहेब दत्तात्रेय कोल्हे यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश अनुभाग अधिकारी, विधी, न्यायपालिका विभागप्रमुख वैशाली बोरुडे यांनी काढला आहे.