Chhattisgarh News: महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थी असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. महाराष्ट्राप्रमाणेच देशभरातील अनेक राज्यांमधील विविध सरकारी योजनांची अशीच स्थिती आहे. भाजपची सत्ता असलेल्या एका राज्यातील महिलांसाठीच्या योजनेत तर चक्क सनी लिओनी लाभार्थी असल्याचे समोर आले आहे. सनी लिओनीच्या नावावर या योजनेचे दरमहा एक हजार रुपये जमा होत आहेत.
मधील महतारी वंदन योजनेमध्ये हा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पॉर्नस्टार सनी लिओनीचे नाव आल्याने सोशल मीडियात याची जोरदार चर्चा होत आहे. सरकारी योजनेतील घोटाळ्याने किती टोक गाठले आहे, याची प्रचिती यातून येत आहे. ही योजना 21 वर्षांहून अधिक वय असलेल्या विवाहित किंवा विधना महिलांसाठी आहे. याअंतर्गत संबंधित महिलांना सरकारकडून दरमहा 1 हजार रुपये दिले जातात.
महतारी योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी लाभार्थ्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड आणि बँक खाते पासबुक आवश्यक आहे. त्याची पडताळणी केल्यानंतर अंगणवाणी सुपरवायझरकडून मंजुरी दिली जाते. पण त्यानंतरही छत्तीसगढमधील बस्तर जिल्ह्यात थेट सनी लिओनीचे नाव योजनेत आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सनी लिओनीचे नाव आल्याने कारभारावर ताशेरे ओढले जात आहेत. या योजनेतील भ्रष्टाचाराबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. छत्तीसगढ प्रशिक्षित डीएट व बीएड संघाच्या सोशल मीडियातील खात्यावरून राज्याचे मुख्यमंत्री विष्णू देव सहाय व कॅबिनेट मंत्री लक्ष्मी राजवाडे, ओ. पी. चौधरी यांच्याकडे चौकशीचे मागणी करण्यात आली आहे.
सोशल मीडियात या योजनेतील भ्रष्टाचाराबाबत चर्चा होत असताना सरकारी पातळीवर याची चौकशी सुरू झाली की नाही, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कागदपत्रांची पडताळणी कुणी केली, सनी लिओनी नाव कसे आले, कुणाच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत, कधीपासून घोटाळा सुरू आहे, आणखी किती बोगस नावे आहेत, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.