मैत्रीचा अनमोल धागा
esakal December 24, 2024 10:45 AM

- शिवानी राठीवडेकर, रितिका श्रोत्री

मैत्री ही नात्यांची सुंदर वीण असते. ही वीण एकमेकांना समजून घेण्यातून आणि अडचणीच्या काळात एकमेकांसाठी उभं राहण्यातून तयार होते. कॉलेजच्या जीवनात अनेकजण आपापल्या वाटचालीसाठी नवीन लोकांना भेटतात, ज्यांच्यासोबत हळूहळू मैत्रीचं नातं घट्ट होतं. अशाच एका सुंदर मैत्रीची गोष्ट आहे अभिनेत्री रितिका श्रोत्री आणि तिची जवळची मैत्रीण शिवानी राठीवडेकर यांची.

दोघींची पहिली भेट पुण्यातील त्यांच्या कॉलेजमध्ये झाली. शिवानी रितिकापेक्षा दोन वर्षांनी सीनियर होती. त्या दोघींचा एका डान्स ग्रुपमध्ये समावेश होत्या. ‘मूड इंडिगो’ या नामांकित फेस्टिवलमध्ये त्यांनी एकत्र परफॉर्म केलं आणि त्यादरम्यान त्यांच्यातली मैत्री अधिक घट्ट झाली. शिवानीची जबरदस्त कोरिओग्राफी आणि रितिकाचा डान्सचा आवडता कल त्यांना एकत्र बांधून ठेवत होता. त्यावेळपासूनच ही मैत्री सुरू झाली, जी आजही त्याच ताकदीने टिकून आहे.

रितिका म्हणते, ‘‘शिवानी फक्त माझी मैत्रीण नाही, ती माझी मार्गदर्शक आणि प्रेरणादेखील आहे. स्वतःचं मत ठामपणे मांडण्याची तिची वृत्ती मला खूप शिकायला मिळाली. शिवानीनं मला शिकवलं, की आपलं मत स्पष्टपणे मांडणं गरजेचं आहे; पण ते कुणालाही दुखावण्याशिवाय करता येतं. ही गोष्ट आज माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप उपयोगी ठरतेय.’’

रितिका पुढे सांगते, ‘आमच्या मैत्रीचं आणखी एक खास कारण म्हणजे पुस्तकांची आवड. तिच्या बाबांचं ‘अक्षरधारा’ नावाचं बुक स्टोअर आहे, आणि मीही वाचनाची खूप मोठी फॅन आहे. त्यामुळे हेही आम्हाला जोडणारं एक माध्यम ठरलं.’

शिवानी सांगते, ‘रितिका माझ्यासाठी फक्त मैत्रीण नाही, तर ती माझ्या लहान बहिणीसारखी आहे. तिची काळजी घेणं माझ्यासाठी खूप नैसर्गिक आहे. आजही आम्ही भेटतो तेव्हा ती कम्फर्टेबल आहे ना, ठीक आहे ना, असं बघण्याची माझी नेहमीच सवय असते.’

शिवानी म्हणाली, ‘रितिकाच्या प्रगतीकडे पाहून मला खूप आनंद होतो. ती लहानपणापासून खूप मेहनती होती, आणि तिच्या मेहनतीचं फळ ती आज एक मोठी अभिनेत्री बनून मिळवत आहे. तिचा आगामी चित्रपट ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ यासाठी मी खूपच उत्सुक आहे. या चित्रपटात ती एक महत्त्वाची भूमिका साकारतेय, ज्याबद्दल तिच्या चाहत्यांमध्येही खूप उत्सुकता आहे.’

रितिका शेवटी म्हणते, ‘मैत्री म्हणजे समजूतदारपणा आणि एकमेकांना समजून घेण्याचं नातं. प्रत्येकवेळी गोष्टी बोलून किंवा कृतीतून व्यक्त होणं शक्य नसतं; पण मैत्रीण ही आपल्या शांततेतूनही आपलं म्हणणं समजून घेणारी असावी. माझ्यासाठी समजूतदारपणा हा मैत्रीचा खरा पाया आहे.’

(शब्दांकन : मयूरी गावडे)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.