- प्रदिप लोखंडे
पिंपरी - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या सदनिका उभारल्या जात आहेत. भोसरी, वाल्हेकरवाडीसह आता चिखली-पेठ क्रमांक १२ येथे साडे सहा हजार सदनिकांची उभारणी केली जात आहेत. दुसऱ्या टप्प्यातील या सदनिकांच्या प्रकल्पाचे बांधकाम प्रगतिपथावर सुरू आहे. आतापर्यंत ३० ते ४० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. या सदनिकादेखील उपलब्ध झाल्यास शहरवासीयांना हक्काचे छत मिळणार आहे.
पीएमआरडीच्या वतीने विविध विकास प्रकल्प हातात घेण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना परवडतील, अशा सदनिकांची देखील उभारणी केली जात आहे. भोसरी व वाल्हेकरवाडी येथे नुकतीच तेराशे सदनिकांसाठी लॉटरी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये तीन हजार नागरिकांनी अनामत रक्कम देखील भरली आहे.
२० लाखांपासून ते ३५ लाखांपर्यंत ही घरे नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आता नव्याने उर्वरित सदनिका उभारण्यात येत आहेत. पेठ क्रमांक १२ येथील ४० एकर क्षेत्रात पहिल्या टप्प्यात ४ हजार ८८३ घरांची उभारणी करण्यात आली आहे. अल्प उत्पन्न गट आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी येथे घरे उभारली आहेत. या प्रकल्पात एकूण ४५ इमारतींचा समावेश आहे.
काय आहेत सुविधा?
प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यातील बांधकामाला जुलै २०२३ पासून सुरुवात झाली आहे. प्रकल्पामध्ये ३ बगीचे, १८ आणि २४ मीटरचे अंतर्गत रस्ते, दररोज ४० लाख लिटर पाण्याचा पुनर्वापर करण्याची यंत्रणा, सौरऊर्जेचा वापर, अडीच हजारांपेक्षा अधिक झाडांचे वृक्षारोपण आदी प्रमुख सुविधा असणार आहेत. त्याशिवाय, या गृहप्रकल्पाशेजारी भूखंडावर शाळा, रुग्णालय, क्रीडांगण यासाठी आरक्षणे आहेत.
म्हाडाप्रमाणे घरांच्या किमती
सध्या या सदनिकांच्या कामाला गती प्राप्त झाली आहे. येत्या वर्षभरात ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. तसेच लॉटरी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याच्या किमती निश्चित केल्या जाणार आहेत. सध्या म्हाडाच्या सदनिकांच्या ज्या किंमती आहेत. त्याच प्रमाणात या किंमती असतील, असे प्रशासनाने सांगितले.
अशी असणार रचना
एकूण ६ हजार ४५२ सदनिकांची उभारणी होणार
पर्यावरण विभाग, बांधकाम विभागाची परवानगी
जुलै २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत
वाहनतळ आणि १४ मजले अशी प्रत्येक इमारतीची रचना
या गृहप्रकल्पाचे एकूण क्षेत्र २९ एकर
प्रकल्पातील एकूण इमारतींची संख्या ४७
उत्पन्न गट आणि सदनिकांची संख्या
वन बीएचके (ईडब्ल्यूएस) - ३३२०
वन आरके (ईडब्ल्यूएस) - ३३२
टू बीएचके (एलआयजी) - १४५६
टू बीएचके (एलआयजी) - १३४४
पीएमआरडीएच्या वतीने पेठ क्रमांक १२ येथे दुसऱ्या टप्प्यातील ६ हजार ४५२ घरे उभारली जात आहेत. त्याचे काम प्रगतिपथावर आहे. काही इमारतींचे चार ते पाच मजली कामदेखील पूर्ण करण्यात आले आहे. साधारणतः प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी एक वर्ष तरी लागण्याची अपेक्षा आहे.
- योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए