Beed: बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार होणार; मुंडे कुटुंबाला बसणार धक्का?
esakal December 25, 2024 01:45 PM

Marathawada Big News : चव्हाट्यावर आलेला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा, सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घुण खुनामुळे ढवळून निघालेले जिल्ह्यातील वातारवण आणि महायुतीच्या नेत्यांमध्येच अलिकडे रंगत असलेल्या कुरघोड्यांच्या पाश्र्वभूमीवर समतोल साधण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत:कडे घेणार असल्याचे मानले जाते. जिल्ह्यावर मुख्यमंत्री देवें्रद फडणवीस यांनी लक्ष घातले असले तरी पालकत्व पवारांकडे देण्याचा पर्याय सरकारमध्ये समोर आला आहे.

विधानसभा निकालानंतर सुरेश धस यांनी आपल्या राजकीय तोफांचा मारा परळीकडे वळविला. पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर आरोपांनी ‘परळीविरुद्ध दोन हात’ अशी नवी राजकीय सुरुवात करणाऱ्या सुरेश धस यांनी आता अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांनाही चांगलेच फैलावर घेतले आहे.

सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घुण खुनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा तत्कालिन तालुकाध्यक्ष विष्णू चाटेचे नाव आणि पवनचक्की खंडणीत धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवरील गुन्हा यामुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

त्यातच आता सुरेश धसांनी या घटनांचा व सत्ताधाऱ्यांचा संबंध यासह परळीतील पिक विमा घोटाळा, व्यापाऱ्यांना होणारा त्रास, परळीतील गुंडगिरी, अनेकांवर खोटे गुन्हे अशा अनेक घटनांवर परळीतील नेत्यांवर आरोपांच्या फैरी सुरुच ठेवल्या आहेत.

महायुतीतील नेत्यांमधील ही धुसफूस आणि राज्यभर गाजलेल्या आणि संसदेशच्या वेशीपर्यंत गेलेल्या सरपंच देशमुख खुन प्रकरणामुळे जिल्ह्यात समतोल निर्माण करण्यासाठी अजित पवारांसारख्या खमक्या नेत्याला पालमंत्रीपद देण्याबाबत सर्वच नेत्यांचे एैक्य झाल्याची माहिती आहे.

तसेही पालकमंत्री म्हणून महायुतीच्या कोट्यात बीड राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असल्याने सुरुवातीला धनंजय मुंडे यांचे नाव आघाडीवर होते. परंतु, आता समिकरणे आणि परिस्थिती पुर्णत: बदलली आहे. या पदासाठी बीड जिल्हा भाजपकडे नसल्याने आणि पुन्हा धस - मुंडे वादामुळेही पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांना पालकमंत्रीपद भेटणे कठीण मानले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख खुन प्रकरणावर मांडलेली भूमिका आणि त्यानंतर त्या भूमिकेची अंमलबजावणी व जिल्ह्यातील राजकीय समतोलामुळे अजित पवारांकडे हे पद शक्य आहे.

.

यापूर्वीही झाला होता असाच फॉर्म्युला

तत्कालिन आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस ताकदवान पक्ष होता. जिल्ह्यातून जयदत्त क्षीरसागर व दिवंगत डॉ. विमलताई मुंदडा यांना मंत्रीपदेही भेटली होती. परंतु, एका टर्ममध्ये काही काळासाठी दिवंगत विक्रमसिंह पाटणकर व काही काळासाठी दिवंगत दिग्वीजय खानवीलकर तसेच बबनराव पाचपुते या नेत्यांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपदे भेटले होते. त्याच धर्तीवर आता अजित पवारांकडे पद देण्याबाबत महायुती सरकार विचार करत आहे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.