कझाकस्तानमध्ये अझरबैजान एअरलाइन्सच्या एम्ब्रेर E190AR विमानाच्या अपघातामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. विमानात 67 लोक होते. या अपघातात 32 लोकांचे प्राण वाचले असल्याचे कझाकिस्तान सरकारने म्हटले आहे. ही विमानसेवा अझरबैजानची राजधानी बाकू येथून रशियातील चेचन्याला जात होती. मात्र नियोजित मार्गापासून काही मैल दूर असलेल्या कझाकिस्तानमधील अकताऊ शहरात हे विमान कोसळले.
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, विमान अपघातात 32 लोकांचे प्राण वाचले आहेत. एम्ब्रेयर जे2-8243 विमानाच्या अपघाताचे अनेक व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर समोर आले आहेत. विमान आपली उंची कायम ठेवण्यासाठी बराच वेळ धडपडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान कधी विमान खाली येते तर कधी पुन्हा वर जाते, मात्र काही वेळाने विमान कोसळते.
अपघाताने त्याचे दोन भाग झाले. विमानाच्या इंजिनच्या भागाला आग लागल्याने अनेक जण दगावले. मागच्या बाजूने काही लोक बाहेर आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडीओमध्ये काही लोक विमानाच्या मागील भागातून चेंगराचेंगरी करत बाहेर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. विमानाच्या मागील भागात आग लागली नव्हती, त्यामुळे 32 प्रवाशांचे प्राण वाचले.
अपघात कसा घडला?अकताऊ विमानतळावर विमान इमर्जन्सी लँडिंग करणार होते. तेव्हा पक्ष्यांचा कळप विमानाच्या इंजिनवर आदळला आणि ऑक्सिजन सिलेंडर फुटला. विमानाने अपघातापूर्वी पक्ष्यांच्या कळपाशी आदळल्याने आणि स्टेअरिंग बिघडल्याने अपघाताचा इशारा दिला होता. वैमानिक शेवटपर्यंत विमानाचा वेग आणि उंची वाढवण्याचा प्रयत्न करत राहिले, पण विमानाने पूर्णपणे नियंत्रण गमावले.
या घटनेच्या व्हिडिओमध्ये असे दिसून आले की विमान वारंवार वर येण्याचा प्रयत्न करते आणि वेगाने वर जाते, परंतु थांबू लागते. शेवटी पायलटने जास्त उंचीवर जाऊन विमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर ते विमानतळाजवळ फिरू लागले, पण शेवटी ते कोसळले. या विमान अपघातामुळे संपूर्ण जगात शोककळा पसरली आहे. अझरबैजान एअरलाइन्सच्या एम्ब्रायर E190AR विमानात रशिया, अझरबैजान, कझाकिस्तान आणि किर्गिस्तानमधील 62 प्रवासी आणि पाच क्रू सदस्य होते.