डॉ. प्रचिती पुंडे
मी डॉक्टर म्हणून काम करत असताना माझा ग्रामीण भागातील महिलांशी संपर्क येत होता. त्यावेळी मला त्यांच्या अडीअडचणी जाणवत होत्या; तसेच आर्थिक दृष्टीने त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करायची होती. मग सुरुवात कुठून करूयात, तर स्वास्थ्यापासून म्हणून सर्वांत पहिल्यांदा योग प्रशिक्षणापासून केली. ते सुरळीत सुरू होतेच; पण महिलांसाठी काय करायचे, हा प्रश्न काही केल्या मला शांत बसू देत नव्हता. याच प्रश्नातून ‘अभिजिता महिला हस्तकला केंद्र’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना झाली.
या माध्यमातून तळागाळापासून ते उच्चपदापर्यंतच्या सर्व स्तरांतील महिलांना सक्षम करणे, त्यांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक स्तर वाढवणे, यासाठी विविध उपक्रम राबविले. एखाद्याची स्थिती सुधारण्यासाठी सुरक्षित वातावरणात आर्थिक सक्षमीकरण आणि नैतिक मूल्यांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. अभिजीता महिला हस्तकला केंद्राच्या माध्यमातून मी करमाळा तालुका, उस्मानाबाद तालुका, सोलापूर, बार्शी, लातूर या भागातील महिलांच्या २५० बचत गटांना सहभागी करून घेतले. या माध्यमातून अडीच हजार महिलांना सदस्यत्व दिले, यास केंद्र सरकारच्या एफएसडीओ आणि एनएसडीसीद्वारे मान्यता आहे. कौशल्यविकासाद्वारे ग्रामीण महिलांचा विकास आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बंजारा कलेचा प्रचार करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते.
थोड्या दिवसांनी असे लक्षात आले, की योगासोबतच आध्यात्मिक; तसेच ग्लॅमर आणि वेलनेस यांसाठी देखील काहीतरी करायला हवे. यातूनच ‘ग्लॅमोवेल’ची सुरूवात झाली. आरोग्य सहज उपलब्ध होण्याकरिता प्रोलक्स (Prolux) वेलनेस ॲप आहे. यामध्ये ४२ वेलनेस टेस्ट होतात आणि महिलांसाठी, फॅमिलीसाठी वेलनेस शक्य होतो.
मी ‘प्रोलक्स’ कंपनीद्वारे निरोगी समाजस्वास्थ्याची संकल्पना रुजविण्यास सुरुवात केली आहे; तसेच ग्लॅमोवेलच्या माध्यमातूनही काम सुरू आहे.
मोफत योग आणि ध्यान सत्र तणाव, आरोग्य समस्या, समवयस्क समस्या आणि मादक पदार्थांचे दुरुपयोग यावर आम्ही समुपदेशन करण्यास सुरुवात केली. विविध आध्यात्मिक संस्थांच्या मार्फत आध्यात्मिक व्याख्यानांचे आयोजन केले. मुलांसाठी संस्कार वर्ग (मूल्य शिक्षण वर्ग), बंजारा हँड एम्ब्रॉयडरीवर कार्यशाळा, सेक्टर स्किल कौन्सिलशी संलग्न अभ्यासक्रम आणि होम फर्निशिंग एम्ब्रॉयडरी प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केले. लाकडी काम, म्युरल्स, स्टेन वूड आदींचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले. पापड, लोणची आणि चटणी बनवण्यासारखे लघुउद्योग उभारण्यासाठी मार्गदर्शन केले.
योग्य समन्वय साधा
मला हल्लीच्या मुलींना सांगावेसे वाटते, की ‘मला माझं करिअर घडवायचं असेल आणि मी लग्न केलं आणि मुलं बाळं झाली, तर मी या शर्यतीतून मागे पडीन का?’ असा प्रश्न तुम्हाला पडला, तर त्यातून संभ्रमित होऊ नका. असे काहीही होत नाही. प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते. तुम्ही योग्य समन्वय साधा आणि त्या त्या वेळी आनंद घ्या. आयुष्यात मिळालेल्या सर्व जबाबदारी तुम्ही उत्कृष्टरीत्या पार पाडू शकता.
(शब्दांकन : प्रियांका सत्यवान)