भारत हा देश खाण्याच्या शौकिनांचा देश आहे. या देशात नॉनव्हेज खाणाऱ्यांची कमी नाही आणि व्हेज खाणाऱ्यांचीही कमी नाही. त्यातही वेगवेगळे प्रकार टेस्ट करण्यावर अनेकांचा भर असतो. त्यामुळेच तुम्हाला देशातील गल्लोगल्लीत खाद्य पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. त्यातच जर तुम्ही बिर्याणीचे शौकीन असाल तर पाहायलाच नको. बिर्याणी खायला कुणाला आवडत नाही? ज्याला बिर्याणी खायला आवडत नाही असा नॉनव्हेज शौकीनच विरळा. आज काल तर घरी बसल्या एका फोनवर तुम्हाला गरमा गरम बिर्याणी थेट घरी मागवता येते. स्विगी या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने 2024 वर्षाच्या शेवटी एक रिपोर्ट जारी केला आहे, हा रिपोर्ट खाण्याच्या आवडी आणि ट्रेंडसवर आधारित आहे. (हे सर्व आकडे 1 जानेवारी 2024 ते 22 नोव्हेंबर 2024 दरम्यान गोळा केलेल्या डेटा वर आधारित आहेत).
स्विगीच्या या अहवालानुसार, 2024 मध्ये देशात बिर्याणीची सर्वात जास्त ऑर्डर करण्यात आली होती. त्यामुळे वर्षभरात ऑर्डर करण्यात आलेल्या पदार्थांमध्ये बिर्याणीचा नंबर अव्वल आहे. स्विगीवर 2024 मध्ये 83 मिलियन बिर्याणी ऑर्डर करण्यात आल्या. याचा अर्थ, भारतात प्रत्येक मिनिटाला 158 बिर्याणी ऑर्डर केल्या जात होत्या (जवळपास प्रत्येक सेकंदाला 2 ऑर्डर). बिर्याणी नंतर दुसऱ्या क्रमांकावर डोसा आहे, डोश्याचे 23 मिलियन ऑर्डर स्विगीवर प्राप्त झाले.
स्विगीने इतरही पदार्थांची माहिती दिली आहे. ही माहिती अतिशय रंजक आहे. बिर्याणीनंतर चिकन बिर्याणीला सर्वाधिक पसंती मिळाल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे दक्षिणेतील लोकांनीच सर्वाधिक चिकन बिर्याणीच्या ऑर्डर दिल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. 2024 मध्ये हैदराबादने 9.7 मिलियन बिर्याणी ऑर्डरसह “बिर्याणी लीडरबोर्ड” मध्ये पहिला नंबर मिळवला. त्यानंतर बंगळुरूमध्ये (7.7 मिलियन ऑर्डर) आणि चेन्नईत चिकन बिर्याणीचे सर्वाधिक ऑर्डर (4.6 मिलियन ऑर्डर) आले.
स्विगीच्या रिपोर्टनुसार, रात्री 12 ते 2 च्या दरम्यान बिर्याणीला सर्वाधिक ऑर्डर मिळाली. या कालावधीत सर्वाधिक ऑर्डर मिळवलेला चिकन बिर्याणी हा दुसऱ्या क्रमांकावरला लोकप्रिय पदार्थ होता. पहिल्या स्थानावर चिकन बर्गर होता. विशेषतः, स्विगीने आता ट्रेनमध्येही सेवा सुरू केली आहे. या सेवेनंतर ट्रेनमध्येही बिर्याणी सर्वाधिक ऑर्डर होणारा पदार्थ बनला.
2024 च्या रमझानमध्ये भारतभर 6 मिलियन प्लेट बिर्याणीच्या ऑर्डर आल्याची माहितीही या रिपोर्टमध्ये आहे. रमझानच्या काळात बिर्याणीच्या सर्वाधिक ऑर्डर हैदराबादमधून आल्या होत्या. हैदराबादमध्ये त्याच वेळी स्विगीवर 10 लाख प्लेट बिर्याणी ऑर्डर करण्यात आल्या होत्या. कोलकात्यात एका व्यक्तीने 1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 4.01 वाजता बिर्याणी ऑर्डर केली होती. त्यामुळे वर्षाची स्वादिष्ट सुरुवात झाली!
याशिवाय पास्ता आणि नूडल्सही लोकांच्या आवडीनुसार यादीत समाविष्ट झाले आहेत. मोमोजच्या तुलनेत, यावेळी नूडल्सच्या ऑर्डर सर्वाधिक होत्या. पास्ताच्या बाबतीत, बेंगळुरूतील एका ग्राहकाने पास्तावर 49,900 रुपये खर्च केले. त्याने जवळपास 55 अल्फ्रेडो, 40 मॅक आणि चीज आणि 30 स्पॅगेटी प्लेट्स ऑर्डर केली होती. डिनरच्या ऑर्डरने लंचपेक्षा 29 टक्के जास्त म्हणजेच 21.5 कोटींचे होते. या रिपोर्टवरून स्विगी भारताच्या खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, असं स्पष्ट होत आहे.