उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडले पाणी! औजमध्ये पाणी ६ जानेवारीला पोचणार; ...तर शेतीसाठी पाणी सोडण्यापूर्वी घ्यावी लागणार जलसंपदा मंत्र्यांची मान्यता
esakal December 27, 2024 05:45 AM

सोलापूर : सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात आता १० ते १५ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. २६) उजनी धरणातून भीमा नदीत साडेसहा हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. ते पाणी औज बंधाऱ्यात ६ जानेवारीपर्यंत पोचणार असून त्यानंतर धरणातील पाणी सोडणे बंद केले जाणार आहे.

सोलापूर ते उजनी ही समांतर जलवाहिनी अजूनही पूर्ण झालेली नाही. नोव्हेंबरअखेर समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, पण विधानसभा निवडणूक व काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे आणि इतर काही अडचणींमुळे काम पूर्ण व्हायला आणखी काही दिवस लागणार आहेत. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर तीन महिने प्रात्यक्षिक चालणार आहे. त्यामुळे औज बंधाऱ्यावरील पाणीपुरवठ्यावर सोलापूर शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी उजनीतून पाणी सोडण्यात आले आहे.

सुरवातीला तीन हजार क्युसेकने सोडलेला विसर्ग रात्री सहा हजार क्युसेक करण्यात आला आहे. उजनी धरणातून सोडलेले पाणी औज बंधाऱ्यात पोचायला साधारणत: १० ते ११ दिवस लागतात. त्यासाठी साडेपाच ते सहा टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. औज बंधाऱ्यातील पाणी साधारणत: ५० दिवस पुरते. त्यामुळे कदाचित आणखी एक आवर्तन सोलापूर शहरासाठी सोडावे लागू शकते, असे महापालिकेचे अधिकारी सांगतात. सध्या उजनी धरण १०० टक्के भरले आहे.

...तर शेतीसाठी पाणी सोडण्यापूर्वी घ्यावी लागणार जलसंपदा मंत्र्यांची मान्यता

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, खातेवाटप देखील झाले. मात्र, जिल्ह्यांचे पालकमंत्री फायनल झालेले नाहीत. उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक आवश्यक आहे. पण, पालकमंत्री निश्चित नसल्याने समितीची बैठक झालेली नाही. शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली असून पुढील आठवड्यात बैठक न झाल्यास थेट जलसंपदा मंत्र्यांना तो प्रस्ताव पाठवून मान्यता घेतली जाणार आहे. १० ते १५ जानेवारी दरम्यान रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सोडण्याचे नियोजन आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.