Australia vs India Boxing Day Test: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत त्याच्या अनोख्या फलंदाजी शैलीसाठी ओळखला जातो. तो बऱ्याचदा जोखीम घेणारे शॉट्सही खेळताना मागे-पुढे पाहत नाही. पण याप्रयत्नात त्याने अनेकदा विकेट्सही गमावल्या आहेत.
अशीत विकेट त्याने सध्या सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीतही गमावल्याचे दिसले. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चौथा कसोटी सामना गुरुवारपासून (२६ डिसेंबर) मेलबर्नला सुरू झाला आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत बाद झाला.
बॉक्सिंग डे कसोटी असलेल्या या सामन्यात पंत दुसऱ्या दिवस अखेर नाबाद होता. त्याने भारताच्या पहिल्या डावात तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजासह चांगली सुरुवात केली होती. त्याने आक्रमक खेळण्याचाही प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याची आणि जडेजाची जोडी जमली होती.
मात्र, चांगल्या सुरुवातीनंतर ५६ व्या षटकात स्कॉट बोलंडने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर ऋषभ पंत स्कूप शॉट खेळायला गेला, पण चेंडू त्याच्या बॅटच्या पुढच्या बाजूला लागला आणि उचं उडाला.
यावेळी हा शॉट खेळताना पंतचा तोलही गेला आणि तो खाली पडला. पण त्याचवेळी थर्ड मॅनला उभ्या असलेल्या नॅथन लायनने त्याचा सोपा झेल घेतला. त्यामुळे पंतला ३७ चेंडूत ३ चौकारांसह २८ धावांवर बाद होत माघारी परतावे लागले.
पंत बाद झाला, तेव्हा भारतीय संघ तब्बल २८३ धावांनी पिछाडीवर होता. त्यामुळे भारतावर फॉलोऑनचे संकट होते. अशात पंतने ज्या निष्काळजीपण त्याची विकेट बहाल केली. त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. अनेकांनी त्याने विकेट ऑस्ट्रेलियाला गिफ्ट दिल्याचीही टीका केली.
दरम्यान, पंत बाद झाल्यानंतर जडेजाला नितीश कुमार रेड्डीने साथ दिली. निकीशने आक्रमक सुरूवात केली. पण याचदरम्यान ६५ व्या षटकात नॅथन लायनने जडेजाला फिरकीत अडकवले. जडेजा ५१ चेंडूत १७ धावांवर बाद झाला. तरी नितीशने त्याची लय कायम ठेवली, त्याला नंतर वॉशिंग्टन सुंदरने साथ दिली.
त्यामुळे भारताने तिसऱ्या दिवशी लंचब्रेकपर्यंत ७३ षटकात ७ बाद २४४ धावा केल्या आहेत. भारत अजूनही २३० धावांनी पिछाडीवर आहे. तसेच भारताला फॉलोऑन टाळण्यासाठी अद्याप ३१ धावांची गरज आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथ (१४०) शतकाच्या आणि इतर फलंदाजांनी दिलेल्या महत्त्वाच्या योगदानामुळे १२२.४ षटकात ४७४ धावांचा डोंगर उभारला आहे.