बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांना भाजप आमदार सुरेश धस यांनी कालच्या मोर्चानंतर गंभीर आरोप केले. आमदार धस यांनी बीडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख करताना काही अभिनेत्रींचीही नाव घेतली. यात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे देखील नावाचा उल्लेख केला. आमदार धस यांनी प्राजक्ता माळी यांचे नाव घेतल्याचे पडसाद मराठी फिल्म इंडस्ट्रीजमध्ये उमटलेत. यावर प्राजक्त माळी आक्रमक झाल्या असून, जाहीर माफी अशी मागणी करताना महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे माळी यांनी म्हटले आहे. दरम्यान, आमदार धस यांना भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुनावले आहे. ते म्हणाले, "आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचे चारित्र्य आणि त्यांच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली. या प्रकरणात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही. सुरेश धस यांना आज मी फोन करणार आहे. सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलता कामा नये".