Marathwada: पाचोडच्या आठवडे बाजारात विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्याचा चिखल!
esakal December 29, 2024 08:45 PM

Pachod Crime: मोठ्या कष्ट व उमेदीने पिकविलेला भाजीपाला विक्रीसाठी बाजारात आणला असता त्याला मातीमोल दर मिळत असल्याचे पाहून संतप्त शेतकऱ्यांनी फुकट --- फुकट म्हणत आपला भाजीपाला रस्त्यावर फेकून दिल्याने सर्वत्र पालेभाज्याचा रस्त्यावर सडा पडून त्यावरून वाहने गेल्याने फळभाज्याचा अक्षरक्षः चिखल झाल्याचे चित्र रविवारी (ता. २९) पाचोड (ता.पैठण) च्या आठवडे बाजारात पाहवयास मिळाले.

धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत रविवारी पाचोड येथे आठवडे बाजार भरतो. या बाजारा ला पैठण तालुक्यासह गेवराई, अंबड, शेवगाव छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणाहून शेतकरी आपला उत्पादीत भाजीपाला व फळभाज्या विक्रीसाठी आणतात, तर हा खरेदीसाठी विविध ठिकाणाहून व्यापारीही मोठ्या प्रमाणात येतात. उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे पालेभाज्यांना उच्चांकीचा दर मिळाल्याने प्रत्येक भाजीपाला उत्पादकांचा कल पालेभाज्या उत्पादनाकडे वाढला. त्यातच समाधारककारक पाऊस झाल्याने विहीरी व कुपनलीकांच्या पाणी पातळीत वाढ होऊन आतापर्यंत सर्व जलसाठ्यांनी तग धरला.

त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीकडे आपला मोर्चा वळविला, तुर्तास सर्वत्र शेतात टोमॅटो,कोबी,वांगे, पालेभाज्या , कोथिंबिरीचे भरमसाठ निघू लागल्याने बाजारात भाज्यांची भरमसाठ आवक होऊन दरात कमालीची घसरण झाली. भाजीपाला लागवड करुन त्याच्यावर केलेला खर्चही हाती येत नसल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत सापडलेले आहे.

उन्हाळ्यासह पावसाळ्यात पन्नास रुपये प्रति जूडीने विकल्या गेलेली पालक व कोथिंबिर, मेथीच्या जुडी आता प्रती दोन रुपये तर शंभर रुपये किलोने विक्री होणारे वांगे पाच ते दहा रुपये किलो विक्री होऊ लागल्याने पालेभाज्या उत्पादकांचा बियाणे, मशागतीचा खर्चही निघत नसल्याने पालेभाज्या उत्पादक शेतकरी हतबल होऊन तो अडचणीत सापडला आहे.

याचाच प्रत्यय येथे रविवारी पाचोड येथे भरलेल्या आठवडे बाजारात पाहवयास मिळाला. येथे विक्रीसाठी आलेल्या भाजीपाला विक्रेत्यांचे बाजारापर्यंत येण्याचे व काढणीचेही पैसे वसुल होत नसल्याने संतप्त भाजीपाला उत्पादकांनी कवडीमोल भाव मिळत असल्याचे पाहून नाईलाजास्त फुकट--- फुकट म्हणत मेथी, कोथिंबिर व वांगे रस्त्यावर फेकून आल्या पावली घराची वाट धरली. तुर्तास बाजारात मोठ्या भाजीपाल्यांची आवक झाल्याने त्यास उठाव नसल्याचे पाहवयास मिळते.

लागवडी पासून ते काढणीपर्यंतचा खर्च निघणे तर सोडाच परंतु साधे वाहनभाडे व काढणीचा खर्च मिळत नसल्याने त्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याशिवाय दुसरा पर्यायच राहीला नाही.टोमॅटो,कोबी,वांगे,भेंडीच्या कॅरेटला दहा ते वीस रुपयाचा भाव व्यापाऱ्याकडून मिळत असल्याचे पाहून शेतकऱ्यांचा पारा चांगलाच चढला, संतप्त शेतकऱ्यांनी आपला आणलेला भाजीपाला अक्षरशः रस्त्यावर फेकून दिला व जड अंत:करणाने आपल्या घराचा रस्ता पकडल्याचे चित्र पाहवयास मिळाले.

उमेश जाधव (पालेभाजी उत्पादक रा. पाचोड.)"सर्वत्र शेतकऱ्यांकडे पालेभाज्या लागवडीसाठी असल्याने बाजारपेठेत वांगे, कोथिंबीरीची आवक जास्त तर मागणी कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने भाव कोसळले आहे"

रमेश जटाडे, (कोथिंबीर उत्पादक, रा.लासुरा, (ता.अंबड)" पालेभाज्यातून दोन पैसे येईल या अपेक्षेने कोथिंबीरीची लागवड केली,परंतु कोथिंबीरलाही कवडीमोल भाव लागल्याने आम्ही कोथिंबीर रस्त्यावरती फेकली. पावसाळा व उन्हाळ्यात पन्नास रुपयास गेलेली जुडी आता चक्क पन्नास पैशात व्यापारी मागणी करू लागले होते. एक हजार कोथिंबीरीच्या जुड्याला केवळ दोनशे रुपयाचा भाव मिळाला".

विठ्ठल भांड ,(वांगे उत्पादक शेतकरी, रा. वडजी (ता.पैठण),"बाजारात वांगे विक्रीला आणले असता १७ किलो वांगेच्या कॅरेटला पंचवीस रूपयांचा भाव मिळाला. त्यामुळे या भावात वांगे तोडणे व बाजारात आणण्याचा खर्चही निघाला नसल्याने आम्हाला वांगे रस्त्यावर फेकून द्यावे लागले."

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.