परभणी शहरातील गंगाखेड कॉर्नर परिसरात 'तीनही मुली झाल्या, मुलगा होत नाही' म्हणून घडली आहे. आरोपीचं नाव कुंडलिक काळे (32 वर्षे) असं आहे.
आरोपीनं पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं. या घटनेतील पीडिता मैनाबाई काळे (30 वर्षे) यांचा यात मृत्यू झाला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे.
या घटनेमुळं मृत महिलेच्या तीन चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरचं आईचं छत्र हरवलं आहे. या मुलींचं वय 6 वर्षे, 4 वर्षे आणि 1 वर्ष आहे.
या प्रकरणी मृत महिलेची मोठी बहीण भाग्यश्री काळे यांच्या तक्रारीवरून आरोपी कुंडलिक काळे विरोधात पत्नीचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपी कुंडलिक काळेला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ननवरे यांनी दिली.
मृत महिलेच्या बहिणीने काय म्हटलं?मृत महिलेची बहीण भाग्यश्री काळे यांनी सांगितलं की, "माझी लहान बहीण मैनाबाई काळे तिचा पती कुंडलिक उत्तम काळे आणि त्यांच्या तीन मुलींबरोबर माझ्या शेजारीच राहत होता.
मात्र, मैनाला तीनही मुली झाल्याने तिचा नवरा कुंडलिक काळे तिला दररोज शिविगाळ आणि मारहाण करायचा. मी अनेकदा त्यांचं भांडण सोडवलं आहे."
"तो अगदी लहान मुलांनाही मारहाण करायचा. या मुलांच्या शरीरावरही मारल्यानं जखमा झाल्याच्या खुना आहेत. तो लहान मुलीला मारून टाकणार होता. त्यामुळे माझी बहीण मुलींना घेऊन माझ्याकडं यायची आणि तो मला मारून टाकेल, माझ्या मुलींना सांभाळ, असं म्हणायची. त्यानं खरंच माझ्या बहिणीला मारून टाकलं," असा आरोप तक्रारदार भाग्यश्री काळे यांनी केला.
"मी बहिणीचा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती वाचली नाही. तिनं रुग्णालयात मृत्यू होण्याआधी तिच्यासोबत काय घडलं हे सांगितलं," असंही तक्रारदार महिलेनं नमूद केलं.
BBC BBC पोलिसांनी काय सांगितलं?कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ननवरे म्हणाले, "आरोपी कुंडलिक काळेविरोधात कोतवाली पोलीस स्टेशनला बीएनएसच्या कलम 103 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार आरोपी तीनही मुली झाल्या म्हणून पत्नीला कायम त्रास देत होता."
BBC कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ननवरे"याच मानसिकतेतून त्या दिवशी आरोपीने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवलं. ही घटना तक्रारदार महिलेने स्वतः बघितली आहे. त्यांची बहीण कपड्याला आग लागलेल्या अवस्थेत रस्त्यावर आली तेव्हा आरोपी कुंडलिक काळे तेथून बळून जात असल्याचं त्यांनी पाहिलं," असंही पोलीस निरीक्षक ननवरे यांनी नमूद केलं.
नेमकं काय घडलं?तक्रारदार बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मावशीला भेटायला दवाखान्यात गेली होती. तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला फोन करून घरी यायला सांगितलं. त्यानं घरी आधीच पेट्रोलचा डबा आणून मारण्याचा कट केलेला होता.
बहीण घरी आल्यावर त्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली आणि तिच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली. त्यानंतर बहिणीने लहान मुलांना बाजूला फेकलं आणि ती घराबाहेर रस्त्यावर पळाली. तसेच मला वाचवा अशी विनंती करत राहिली.
"तिन्ही लेकरं थोडक्यात वाचली आहेत. मी तक्रार दाखल केली आहे. त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. पुन्हा कोणत्याच महिलेवर असा अत्याचार, अन्याय होऊ नये", अशी मागणी तक्रारदार महिलेने केली आहे.
यानंतर आरोपीनं तक्रार करणाऱ्या बहिणीवर म्हणजे भाग्यश्री काळेवरच हत्येचा आरोप केल्याचं त्यांनीच सांगितलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)