पुणे – कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ येथे आज 207वा शौर्यदिन साजरा केला जात आहे. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्यप्रदेश येथूनही अनुयायी लाखोंच्या संख्येने दाखल झाले आहेत. शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विविध रंगांच्या फुलांनी विजयस्तंभाची सजावट केली गेली आहे. विजयस्तंभ परिसरात पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात आहे. तसेच पुणे आणि मुंबईकडून येणाऱ्या वाहनांसाठी आणि नगर कडून येणाऱ्या वाहनांसाठी वेगवेगळी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास एक लाख वाहनांसाठीची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
यंदा शौर्यदिनाचा 207वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने ऐतिहासिक विजयस्तंभ परिसरात शौर्यदिन कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाकडून केले गेले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या बार्टी संस्थेकडून येथे सर्व व्यवस्था आणि तयारी केली गेली. यंदाचे वर्ष हे भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्याच दृष्टीने विजयस्तंभाची सजावट करण्यात आली आहे. विजयस्तंभाची सजावट करण्यासाठी 70 हजार कृत्रिम फुले तर 1 हजार किलो विविध रंगी फुलांचा वापर करण्यात आला आहे.
– Advertisement –
महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय मंत्री संजय बनसोडे, मंत्री दत्ता भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पहाटेच विजयस्तंभाला अभिवादन केले. यावेळी महार रेजिमेंट, समता सैनिक दल आणि पोलीसांतर्फे अभिवादन देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही सकाळी 7 वाजता विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आले होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जोपर्यंत सामाजिक विषमता आहे तोपर्यंत येथे गर्दी होत राहणार आहे. सामजिक विषमता ही वरवर पाहता संपली असे वाटत असले तरी ती मानसिकता अजून संपलेली नाही. त्यातूनच परभणी आणि बीडसारख्या घटना घडत असतात. विषमतेची लढाई फिजिकली संपली असली तरी मानसिकरित्या अजुनही सुरुच आहे, असं मी मानतो. जोपर्यंत हे सुरु आहे तोपर्यंत अभिवादनासाठी गर्दी होत राहील.
– Advertisement –
राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आज 207वा शौर्यदिन आहे. सरकार म्हणून सर्व सोयी पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांसाठी सोयी-सुविधांसाठी प्रशासन सज्ज आहे. सामाजिक न्याय विभागाकडून सर्व सोयी सविधा पुरवल्या जात आहेत. सर्वांना आवाहन आहे की, शांततेत अभिवादन करावे.
1 जानेवारी 1818 साली पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा येथील भीमा नदीच्या काठावर दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांमध्ये युद्ध झालं. इंग्रजांच्यावतीने बॉम्बे नेटिव्ह इन्फँट्री या सैनिकांच्या तुकडीतील 500 सैनिकांनी पेशव्यांच्या बलाढ्य सैन्यासोबत लढा दिला आणि त्यांना हरवलं होतं. तत्कालिन अस्पृष्य समजल्या जाणाऱ्या जातीतील हे 500 सैनिक होते. त्यांनी पेशव्यांच्या सैन्याला लढाईत धूळ चारली. या विजयाचे प्रतिक म्हणून इंग्रजांनी युद्धाच्या मैदानावर अर्थात भीमा नदीजवळ विजयस्तंभ उभारला. या स्तंभावर युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांचा गौरवाने उल्लेख करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयस्तंभाला भेट दिली होती, आणि हा आपल्या शौर्याचा इतिहास असल्याचे म्हटले होते.
1 जानेवारी 2018 साली 200व्या शौर्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. त्या वर्षी येथे दंगल उसळली आणि त्यात एक जणाचा मृत्यू झाला होता. तर हजारो अनुयायी जखमी झाले होते. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर शौर्यदिनाचा इतिहासाची संपूर्ण देशात प्रसार होऊन लाखोंच्या संख्येने अनुयायी येथे दरवर्षी अभिवादनासाठी येतात आणि शौर्यदिन साजरा करतात.
हेही वाचा : Prakash Ambedkar : कराड प्रकरणी फडणवीस सरकारवर दबाव, त्यांनी बळी पडू नये; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला
Edited by – Unmesh Khandale