टीम इंडियाला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. आता टीम इंडियाला मालिका पराभव टाळण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत पाचवा आणि अंतिम सामना जिंकावा लागणार आहे. उभयसंघातील पाचवा सामना हा 3 जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे. एकाबाजूला ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकण्याच्या तसेच किमान ड्रॉ करण्याच्या हिशोबाने मैदानात उतरेल. मात्र दुसऱ्या बाजूला टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय खेळाडूंवर मोठी जबाबदारी असणार आहे.
कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना या मालिकेत आतापर्यंत काही खास करता आलेलं नाही. विराटने पर्थ टेस्टमध्ये शतक करत अनेक महिन्यांची प्रतिक्षा संपवली. मात्र विराटकडून त्यापेक्षा अधिक अपेक्षा आहे. विराटला रनमशीन का म्हणतात? हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. त्यातही विराटची सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये दमदार आकडेवारी आहे. त्यामुळे विराटकडून पुन्हा एकदा सिडनीत विशाल खेळी अपेक्षित आहे.
विराटने आतापर्यंत सिडनीत एकूण 3 कसोटी सामने खेळले आहेत. विराटने या 3 सामन्यातील 5 डावांमध्ये 49.60 च्या सरासरीने 1 शतकासह एकूण 248 धावा केल्या आहेत. विराटची सिडनीतील 147 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. विराटचे सिडनीतील आकडे नावाप्रमाणेच विराट आहेत. त्यामुळे आता विराटकडून नववर्षात धमाकेदार खेळीची अपेक्षा असणार आहे.
पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, ट्रेव्हिस हेड (उपकर्णधार), जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.