डोंबिवली - मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिठाईत गुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. पिडीत मुलगी व तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देत नराधम वारंवार अत्याचार करत होता.
मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होताच नराधम पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी त्याचा शोध घेत उत्तर प्रदेश येथून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. संदीप कुमार (वय 32) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत अल्पवयीन मुलगी व अत्याचार करणारा इसम हे उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून एकमेकांना ओळखत होते. भंगार गोळा करून ते आपली उपजीविका करत होते. संदीप हा पिडीत मुलीच्या कुटुंबा शेजारीच रहात होता. जानेवारी 2022 पासून तो पिडीत मुलीला त्रास देत होता. आक्टोंबर 2024 मध्ये संदीप याने पीडित मुलीला बहाण्याने मिठाई मधून गुंगीचे औषध देत तिच्यावर राहत्या घरात अत्याचार केला.
पिडित मुलगी भयभीत झाल्याचा फायदा घेत तिला व तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार करत होता. वारंवार होणाऱ्या अत्याचार मुळे पिडीत मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत डिसेंबर 2024 मध्ये संदीप याच्या विरोधात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत संदीप याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
संदीप हा त्यावेळी त्याच्या मूळगावी उत्तरप्रदेश मधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील एका गावात पळून गेला असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली.
मानपाडा पोलिसांनी उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथील एसटीएफ पथकाला दिली. या पोलीस पथकाने 4 जानेवारीला उत्तर प्रदेशातील ग्राम मरवटीया कुर्मी गावाच्या हद्दीत सापळा रचून संदीपला ताब्यात घेतले. त्यानंतर कपिलवास्तु पोलीस ठाण्यात त्याला ताब्यात घेतल्याची माहिती नोंद करून 6 जानेवारीला उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपीला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.